मुंबई: भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. काही मुद्यांमुळे अशोक चव्हाण यांना मनसे अडचणीची वाटत असली तरी, आम्ही काँग्रेसची मर्जी राखूनच राज ठाकरेंना महाआघाडी सोबत घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘लोकमतह्ण दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.महाआघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारले असता मुंडे म्हणाले, पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे.पण भाजप विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेसची मर्जी राखून मनसेला सोबत घ्यावे लागेल. राष्टÑवादीकडील हातकणंगले ही जागा आम्ही राजू शेट्टी यांना देत आहोत. याच पद्धतीने काँग्रेसही आपल्या वाट्याची एक जागा त्यांना देईल.माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास राज्यातील १५ टक्के मते स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, असा दावाही मुंडे यांनी केला.ही तर घराणेशाही !बीड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे एकाच घरात सत्ता. एक बहीण आमदार, एक बहिण खासदार, तर एक बहीण पालकमंत्री! जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडे असताना तुम्ही काय केलं? आजही आमच्या बीड जिल्ह्यावरील ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक आम्ही पुसू शकलो नाहीत. एक सिंचनाचा नवीन प्रकल्प यांनी सुरू केला का, जलयुक्त केले तेही फक्त कार्यकर्ते पोसायला, अशी टीकाही धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
काँग्रेसची मर्जी राखूनच मनसेला सोबत घेऊ! - धनंजय मुंडे
By राजा माने | Published: February 14, 2019 2:51 AM