- नारायण जाधव, ठाणेराज्यभरातील दोन कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधारकार्डच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार आहेत. गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार १९८ कोटी ६४ लाख रुपये खर्च करणार आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्डद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्य वितरणात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या खर्चास अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. यात केंद्र सरकारने दिलेल्या ६९ कोटी ७३ लाख आणि राज्य सरकारच्या १०३ कोटी ९९ लाख खर्चास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राची दुसऱ्या टप्प्यातील मदत अद्याप आलेली नाही. राज्यात सुमारे दोन कोटी ३७ लाख १० हजार ६६६ रेशनकार्डधारक आहेत. त्यात बीपीएल- ४५ लाख ३४ हजार ८३६, अंत्योदय कार्डधारक- २४ लाख ७२ हजार ७५३, केशरी कार्डधारक- एक कोटी ४६ लाख ४५ हजार २३, पांढरे कार्डधारक- १९ लाख ९३ हजार १८६ आणि अन्नपूर्णाधारक ६४ हजार आहेत. या सर्वांना ५१ हजार ५०० हून अधिक रेशन दुकानांच्या माध्यमातून साखर, गहू, तांदूळ, केरोसीनसह इतर अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.मात्र, या वितरण व्यवस्थेत रेशन दुकानदारांपासून गोदामचालक आणि सरकारी अधिकाऱ्यांपर्यंतच्या साखळीतील काही लोकांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. गहू, तांदळाची बेकरीमालकांना काळ्याबाजारात विक्री होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच बायोमेट्रीक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे.असे असेल बायोमेट्रिक कार्ड सध्याच्या जुनाट रेशनकार्डची जागा हे अत्याधुनिक बायोमेट्रीक स्मार्टकार्ड घेणार आहे. ते आधारकार्डशी जोडले जाणार आहे. कार्डधारकाच्या नावासह कुटुंबातील सदस्यांचा संपूर्ण तपशील, त्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुब्बुळाच्या इमेजेस त्यात असतील. या कार्डची नोंद रेशन दुकानदारांकडील संगणकातही राहणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त त्याचा वापर अन्य कुणाला करता येणार नाही.सध्या एखाद्या रेशनकार्डचा वापर करून दुसरे कुटुंब ते उधार मागून करू शकते. मात्र, बायोमेट्रीक कार्डचा वापर तशा प्रकारे करता येणार नाही. जरी दुसऱ्याला ते दिले तरी संबंधित कुटुंबातील एका सदस्याला कार्ड नेणाऱ्या शेजाऱ्यासोबत जावे लागेलच. त्याशिवाय, त्याला संबंधित दुकानदार धान्य देऊ शकणार नाही.
शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याच्या खर्चास मंजुरी
By admin | Published: August 28, 2015 2:14 AM