मुंबई : मुंबईतील शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्न, समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी मुंबईत पार पडलेले शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन शिक्षकांसाठी सकारात्मक ठरले. शनिवारी झालेल्या अधिवेशनात शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठरावांना मंजुरी देण्यात आली आहे. शिक्षकांना यंदाच्या अधिवेशनाकडून खूप अपेक्षा होत्या. मुंबईतील विविध शाळांतील ८०० शिक्षक या अधिवेशनाला उपस्थित होते. या अधिवेशनाला शिक्षकांच्या ९ मागण्यांचे ठराव मंजूर झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सातवा वेतन आयोग तातडीने लागू करण्यात यावा, सदोष संचमान्यतेत दुरुस्ती करणे, प्लॅन व नॉन प्लॅनमधील भेदभाव दूर करणे, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करणे, शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना तातडीने मंजूर करणे, शिक्षिकांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करणे, रात्रशाळांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, कला, क्रीडा, संगीत, तंत्रशिक्षण आणि अपंग समावेशित शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, वेनतेतर अनुदानात वाढ करणे या मागण्यांचे ठराव या अधिवेशनात मंजूर झाले. शिक्षक चळवळीवर अतिक्रमण होताना दिसत आहे. अशैक्षणिक क्षेत्रातील लोक शिक्षक चळवळीत घुसखोरी करून आमदारकी पटकावत आहेत. हे अयोग्य असून, शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा, असा सूर या अधिवेशनात दिसून आला. नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो पुंडलिक गाणार यांनी अधिवेशनात शिक्षणाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी शिक्षण चळवळीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात व्हावी. चळवळीचे गतवैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन शिक्षकांना केले. या अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, कलचाचणी, दहावी पुनर्परीक्षा यांसह अन्य योजना राबविल्याने येत्या काही काळात राज्य शिक्षणात पुन्हा १ क्रमांकाचे राज्य होईल. शालेय शिक्षण विभाग व राज्यातील सर्व शिक्षकांच्या मेहनत व कष्टाने हे सर्व शक्य होत असल्याने समाजात शिक्षकांचा सन्मानही वाढत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनाला माजी आमदार संजीवनी रायकर, शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे, शिवनाथ दराडे, उल्हास वडोदकर यांच्यासह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांसाठीच्या महत्त्वाच्या योजनांना मंजुरी
By admin | Published: February 12, 2017 4:34 AM