अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यांच्या १३ पैकी ८ वाणांसह ४५ विविध विषयांवरील संशोधन शिफारसींना बुधवारी दापोली येथील राज्यस्तरीय संयुक्त संशोधन समिती (जॉइन्ट अँग्रोस्को)च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात आयोजित ह्यजॉइन्ट अँग्रोस्कोह्णच्या बैठकीत, कृषी शास्त्रज्ञांच्या विविध संशोधनांना मान्यता देण्यात आली. या बैठकीचा बुधवारी समारोप झाला. बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या संशोधनांचा सूक्ष्म आढावा घेण्यात आला. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशी, धान, फळे व भाजीपाला, तेलबिया, तृणधान्य, डाळवर्गीय पिके, ज्वारी, मृद व जल, तसेच जैव तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संशोधन केले आहे. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणार्या धानाच्या विविध जातींच्या संशोधनावर यावर्षी अधिक भर देण्यात आला होता. एकूण १३ नवे वाण व ७0 विविध तंत्रज्ञानाच्या शिफारशी या कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८ नव्या वाणांना बुधवारी मान्यता देण्यात आली. याशिवाय विविध तंत्रज्ञानांशी संबंधित ७0 पैकी ४५ शिफारसीही मान्य करण्यात आल्या. विदर्भात अलीकडे फुलशेतीचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, पंदेकृविने भरघोस उत्पादन देणार्या ग्लॅडीओलस व शेवंती या फुलांच्या जातीवर संशोधन केले आहे. विद्यापीठाने लिंबू, हळद, हिरवी वांगी, चोखा दोडका, वाल इत्यादी फळे व भाजीपाला पिकांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, तसेच अधिक उत्पादन देणारी पॅडी-एसवाय-६३ ही धानाची जात विकसित केली आहे. हळद काढणी व ज्वारी कापणी यंत्रही या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. वांगे, चोखा दोडका, वाल व पोयटा या सर्व जाती अधिक उत्पादन देणार्या आहेत. या चारही वाणांवर उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉ. विजय दोड यांनी संशोधन केले आहे. हळद पिकावर डॉ. विजय काळे यांनी संशोधन केले असून, लिंबूच्या नवीन जातीवर डॉ. प्रकाश नागरे यांनी संशोधन केले आहे. अधिक उत्पादन देणार्या ग्लॅडीओलस व शेवंती या फुलांच्या जाती डॉ. दलाल यांनी विकसित केल्या आहेत. या वाणांना मान्यता मिळाल्याने, आता पुढील संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे. कुलगुरु डॉ. रविप्रकाश दानी यांच्या मार्गदर्शनात, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या नेतृत्वातील समितीने ह्यजॉइन्ट अँग्रोस्कोह्णच्या बैठकीत, विद्यापीठाच्या शिफारसी मांडल्या होत्या.
**अखेर वायगावच्या हळदीला मिळाला न्याय!
वर्षानुवर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या वायगावच्या हळदीला अखेर न्याय मिळाला. कृषी संयुक्त संशोधन समितीच्या बैठकीत वायगाव हळदीला मान्यता देण्यात आली. ही मान्यता मिळाल्याने आता शेतकर्यांना हळद लागवडीसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.