मुंबई - राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.
यापूर्वी, २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामी अप्रत्यक्षरित्या शासनालाही महसूल वाढ मिळते.