- वर्धा-नागपूर चौथा मार्ग
मुंबई : वर्धा ते नागपूर अशा चौथ्या मार्गाच्या प्रकल्प खर्चाला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ६३८ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यास मदत मिळेल. सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा ते नागपूर हा दुहेरी मार्ग असून तो सर्वात व्यस्त असा मार्ग समजला जातो. हा मार्ग उत्तर-दक्षिण भागातील चेन्नई ते दिल्ली आणि पूर्व-पश्चिमवरील मुंबई ते कोलकोतालाही जोडलेला आहे. वर्धा ते नागपूर मार्गावर तिसऱ्या मार्गाचेही काम सुरु असून त्याला याआधीच मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावरील गाड्यांची वाहतूक पाहता चौथ्या मार्गाची गरज होती. त्याबाबत प्रकल्पाच्या खर्चाचा प्रस्ताव नीती आयोगाकडे मंजुरीसाठी होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही अंतिम मंजुरी दिल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. चौथा मार्ग झाल्यास प्रवासी आणि येथून होणारी मालवाहतूक विनाअडथळा तसेच जलद होऊ शकेल. एकूण १४७ पूल, आठ रोड ओव्हर ब्रीज आणि ४ रोड अंडर ब्रीज प्रकल्पात आहेत. येथे विद्युुतीकरणही होणार आहे. (प्रतिनिधी)