ऑनलाइन लोकमत -
शहरातील चौपदरीकरणातील गुंता सुटला
154 पिलरचा दीड कि. मी.चा उड्डाणपूल बहादूरशेखनाका ते शिवाजीनगर दरम्यान उभारणी
कळंबस्ते ते कापसाळदरम्यान सर्व्हीस रोड
शहरात दोनच अंडरपास मार्ग
चिपळूण, दि. 16 - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात शहराची मोडतोड होऊ नये याकरिता पर्यायी, भुयारी अशा सर्व मार्गांची चाचपणी केल्यानंतर अखेर उड्डाणपुलावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बहादूरशेखनाका ते शिवाजीनगर दरम्यान साधारण 1.56 किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे 154 पिलरच्या उड्डाणपुलाला रस्ते विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातून होणाऱया चौपदरीकरणावरून निर्माण झालेला गुंता सुटला आहे. दरम्यान, कळंबस्ते व कापसाळ दरम्यान सर्व्हीस रोड तयार केला जाणार असून शहरात मात्र दोनच अंडरपास मार्ग राहणार आहेत.
चौपदरीकरणाची घोषणा झाल्यानंतर शहरातील मार्गात होणा-या मोडतोडीबाबत सुरूवातीपासूनच वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले होते. बहादूरशेखनाका ते कापसाळदरम्यान शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व वाडय़ावस्त्या असल्याने निर्माण होणा-या अडचणी आणि रूंदीकरणात इमारतींची होणारी मोडतोड लक्षात घेऊन सुरूवातीला फरशी तिठा ते पाग असा पर्यायी मार्गाचा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर उड्डाणपूलाच्या पर्यायावरही चर्चा झाली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बहादूरशेखनाका ते कापसाळ अथवा कामथे डोंगरातून बोगदा काढण्याचा पर्याय सुचवला. त्यानुसार तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना हरियाणाच्या व्हायरस या कंपनीला देण्यात आल्या होत्या.
यातच बायपास व भुयारी मार्गाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला. त्यात बायपासपेक्षा उड्डाण पूल सोयीचा असेल, असा अहवाल अधिकाऱयाकंडून देण्यात आल्यामुळे महामार्ग चिपळुणातूनच जाणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने उड्डाणपुलावर शिक्कामोर्तब केले असून त्याचा आराखडाही प्राप्त झालेला आहे.
असा असेल उड्डाणपूल
परशुराम ते खेरशेत अशा चौदा गावांतून जात असलेल्या या महामार्गात आता वाशिष्ठी नदीवरील पुलापासून मातीचा भराव टाकत बहादूरशेखनाका येथून या उड्डाणपुलाला प्रारंभ होणार असून शिवाजीनगर येथे शेवटचा पिलर असणार आहे. सहापदरी असलेल्या या उड्डाणपुलासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी 77 असे एकूण 154 पिलर असणार आहेत. यामध्ये बहादूरशेख नाका येथे 19 फूट उंचीचा पिलर टाकून खाली सुमारे 40 मीटर रूंद गाळा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे. यानंतर शिवाजीनगर येथे अंडरपास असून शहरात केवळ दोनच अंडरपास असणार आहेत.
पंधरा ठिकाणी प्रवेशमार्ग
परशुराम ते आरवली या टप्प्यात एकून पंधरा ठिकाणी प्रवेश असणार आहेत. यामध्ये अंडरपास, जनावरांसाठी तसेच डिव्हायडर कट असे मार्ग असणार आहेत. शहरात कळंबस्ते ते कापसाळपर्यंत सर्व्हीस रोड असणार आहे. शहरात 45 मीटरच भूसंपादन करण्यात आलेले आहे.
शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न निकालात निघाल्याने आता पुढील कामांना वेग येणार आहे. मुळातच परशुराम ते आरवली या 36 कि. मी.च्या टप्प्याची निविदा यापूर्वीच निघालेली असून ते काम मुंबई-ठाणे येथील इगल इन्फ्रा इंडिया या कंपनीला मिळालेले असून शहराची प्रलंबित असलेली थ्रीडी अधिसूचनाही आता मंजूर झाली की चौपदरीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे.
असा असेल प्रवेश
परशुराम ते आरवलीदरम्यानच्या टप्प्यात फरशीतिठा, रेल्वेस्टेशन, कळंबस्ते फाटा, युनायटेड स्कूल, कामथे पोस्टाजवळ, कोंडमळा फाटा, सावर्डे बाजारपेठ, दहिवली रोड, डेरवण रोड, आबलोली रोड-निवळीफाटा येथे वाहनांसाठी अंडरपास, तर कामथे रेल्वेस्टेशन येथे गुरांसाठी तसेच कामथे हॉस्पिटल, नायशी फाटा, कुटरे फाटा, आंबतखोल फाटा येथे डिव्हायडर कट करून प्रवेश मार्ग असणार आहे.