नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. काही रिक्षा चालक रांगेत उभे राहात नाहीत. मीटरप्रमाणे रिक्षाही चालविल्या जात नसून रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्याकडे आरटीओसह वाहतूक पोलिसांना अपयश आले आहे. हार्बर मार्गावरील पनवेल हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे. सर्वाधिक गर्दी याच परिसरात होत असते. पनवेलच्या ग्रामीण परिसराचेही शहरीकरण झाले आहे. याच परिसरात स्वस्त घरे असल्यामुळे अनेकांनी पनवेलच्या आजूबाजूला घरे विकत घेतली आहेत. यामधील बहुतांश नागरिक नोकरीसाठी मुंबई, नवी मुंबई व इतर ठिकाणी जात असतात. रेल्वे स्टेशनपर्यंत व पुन्हा येथून घरी जाण्यासाठी अनेक प्रवासी रिक्षाचा पर्याय निवडत आहेत. अनेकांना त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचाच गैरफायदा घेत काही रिक्षा चालक नियम धाब्यावर बसवत आहेत. येथे रिक्षा रांगेत उभ्या केल्या जातात, पण चालक रिक्षातून उतरून चालकांना अक्षरश: ओढून रिक्षापर्यंत घेवून जातात. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे. रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. चालक मागतील तेवढे पैसे द्यावे लागत आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रोडची एक बाजू रिक्षांनी व्यापलेली असते. यामुळे प्रवाशांना स्टेशनमध्ये येण्यासही अडथळा निर्माण होत आहे. रिक्षा चालक वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवत असूनही आरटीओ व वाहतूक पोलीस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. वास्तविक रिक्षा संघटना व चालकांची बैठक घेवून मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. रेल्वे स्टेशनबाहेर स्टँडचा एरिया ठरवून देणे आवश्यक आहे. रांगेत न थांबणाऱ्यांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. पण ज्यांनी कारवाई करायची तेच दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
पनवेलमध्ये रिक्षाचालकांची मनमानी
By admin | Published: March 04, 2017 2:46 AM