सिकंदर अनवारे, महाड/दासगावमहाराष्ट्रात गडकिल्ल्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली आहे. ज्या पुरातत्त्व खात्याला तत्त्वच शिल्लक राहिलेले नाही त्या खात्याकडून गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होणार, असा प्रश्न शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून पाचाड आणि किल्ले रायगडावर आयोजित रायगड महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. समारंभात उद्धव ठाकरे यांनी रायगडावरील विविध जिवंत देखावे पाहिले. राजदरबारात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला. बाजारपेठेतून पुढे जाताना ठाकरे यांनी शिवसमाधीचे दर्शन घेतले. पाचाड येथील शिवसृष्टीजवळील सभेस मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी नितीन देसाई यांनी केलेल्या किल्ले रायगडावरील जिवंत देखाव्यांचे कौतुक केले. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे गडावर काहीही शाबूत राहिले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गडांचे ऐतिहासिक महत्त्व माहीत नसणाऱ्या पुरातत्त्व खात्याच्या हातात राज्यातील गड आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नियमाप्रमाणे सोमनाथ मंदिर कधीही झाले नाहीत तर राम मंदिर कधीही उभे राहणार नाही, असे ठाकरी शैलीतील विधान करीत गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शिवसेना शासनासोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. समारोप सोहळ्याला विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, छ. संभाजी राजे, आमदार भारत गोगावले, आमदार मनोहर भोईर, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
पुरातत्त्व खात्याला तत्त्वच उरले नाही
By admin | Published: January 25, 2016 2:45 AM