मुंबई : घोटाळेबाज ठेकेदारांची कोंडी करण्यासाठी महापालिकेने जालीम उपाय आणला आहे. त्यानुसार ठेकेदारांच्या प्रत्येक हिशेबावर संगणकाद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कामचुकार ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे होणार आहे. तसेच दंडाची रक्कम पालिकेकडे ठेव स्वरूपात असलेल्या रक्कमेतून वळती करून घेण्यात येणार आहे.गेल्या वर्षभरात महापालिकेत काही मोठे घोटाळे उघड झाले. घोटाळेबाज ठेकेदारांनी महापालिकेच्या पारदर्शक कारभारालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे शहाणपण आलेल्या महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत.ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या हमी कालावधीनंतर कंत्राट ठेव व कामाच्या रकमेच्या पाच टक्के राखून ठेवलेली रक्कम परत दिली जाते. ही रक्कम परत देताना सदर ठेकेदाराने केलेल्या इतर कामांच्या अनुषंगाने काही येणे रक्कम आहे का? याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग व खात्यांकडे पत्र पाठवून विचारणा करण्याची आतापर्यंतची पद्धत होती.यामुळे काही प्रकरणात ही माहिती मिळण्यास विलंब होत असे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता या बाबी इआरपी सॉफ्टवेअरवर आधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काम निकृष्ट दर्जाचे असल्यास ठेकेदाराच्या जमा रक्कमेतून आवश्यक ती रक्कम व दंड कापून घेतला जाणार आहे.विविध नागरी कामे करणाऱ्या ठेकेदारांची निवड निविदा प्रक्रियेने केली जाते. तसेच कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर कंत्राट ठेव म्हणून घेतलेल्या एकूण देयकाच्या पाच टक्के रक्कम राखून ठेवण्यात येत असते. हमी कालावधी दरम्यान कामात त्रुटी आढळल्यास ठेकेदाराच्या ठेवीमधून ही रक्कम वसूल केली जाते. (प्रतिनिधी)
घोटाळेबाज ठेकेदारांना बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 5:13 AM