ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे. सैराट प्रदर्शित झाला त्यावेळी रिंकू दहावीच्या वर्षाला होती. त्यामुळे तिचा दहावीचा निकाल काय लागतो, तिला किती टक्के मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुक्ता होती.
रिंकू दहावीच्या परिक्षेत 66.40 टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आता रिंकू तिचे पुढचे शिक्षण कुठून पूर्ण करणार, कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली होती. अखेर काल पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात रिंकूने तिच्या भावी वाटचालीबद्दल माहिती दिली. रिंकू तिची अभिनयातील कारकीर्द चालू ठेवणार आहे पण त्याचवेळी शिक्षणही अर्ध्यावर सोडणार नाही.
रिंकू तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार आहे. मात्र ते कोणते महाविद्यालय असेल याचा खुलासा रिंकूने केला नाही. रिंकू नववीमध्ये असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती दहावीमध्ये असताना सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण सुरु झाले. त्यामुळे रिंकूला दहावीच्या अभ्यासासाठी फार वेळा मिळाला नव्हता तरी, तीने दहावीमध्ये फर्स्ट क्लास मिळवला.
आणखी वाचा
रिंकूच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50 असे यश तिने मिळवले आहेत. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे.
सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत.