पुणे- निर्माता आणि दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बॅचलर ऑफ आर्किटेकचे त्याचे शिक्षण झाले आहे. हा आर्किटेकट नाशिक, मुंबई, कोल्हापूरसह गोव्यातील महिला आणि छायाचित्रकारांशी गोड बोलून त्यांची फसवणूक करीत होता.
संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्डी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हळदी येथील असून सध्या नवी मुंबईत राहतो. जस्ट डायलवरून महिलांचे फोन नंबर घ्यायचा आणि फेसबुक व सोशल नेट्वर्किंगवरून फोटोग्राफर आणि मॉडेल होण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करायचा तसेच तरुणींचे फोटो शूट करायचे आहे तुम्ही किती पैसे घेता अशी फोटोग्राफरला विचारणा करून मॉडेलचे फोटो शूट करून घ्यायचा,महिलांना फोटो शूट करण्याचे आमिष दाखवायचा आणि पसार व्हायचा अशाप्रकारे महिला आणि छायाचित्रकाराना त्यांने गंडा घातला.
गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांना याच्याबाबात माहिती मिळाली. त्यानुसार, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन भोसले-पाटील व त्यांच्या पथकाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने संदीप व्हरांबळे याला नाशिक येथून सापळा रचून अटक केली. दरम्यान अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.