ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात मुख्यमंत्री यांच्यासहीत हेलिकॉप्टरमधील 5 जण बचावले होते. यासंदर्भातच सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षित राहण्याचं मनावर घेतले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. शिवाय फडणवीस यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करीत आहोत, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत उद्धव यांनी दुसरीकडे सरकारी हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले आहेत.
दरम्यान, ज्या दिवशी हा अपघात घडला होता तेव्हादेखील उद्धव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांची विचारपूस केली होती.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भयंकर अशा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. त्यांचे नशीब बलवत्तर आहे व महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. निलंगा येथे त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. विजेच्या तारांना हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला आणि सुमारे ८० फुटांवरून खाली येत ते जमिनीवर कोसळले. उड्डाण घेऊन हेलिकॉप्टर काही उंचावर आल्यानंतर हवेचा दाब अचानक कमी झाला. एअर टर्ब्युलन्समुळे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने शिताफीने ते उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हेलिकॉप्टर कोसळलेच. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही. मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी या अपघातातून सुखरूप बचावले हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यावरचे एक संकट टाळल्याबद्दल आम्ही आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत आहोत. मुख्यमंत्र्यांना अखंड महाराष्ट्राची भरपूर सेवा करायची आहे व महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथावर न्यायचे आहे. त्यामुळे कोणतेही संकट व अडथळे त्यांना रोखू शकणार नाहीत हेच निलंग्याच्या दुर्घटनेवरून दिसते.
‘‘मी ‘बाहुबली २’ की काय ते दाखवायला तयार आहे,’’ असे आव्हान फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी राजकीय विरोधकांना दिले होते. निलंग्याच्या अपघातानंतर फडणवीस हे स्वपक्षातील विरोधकांसाठी बाहुबली व इतर विरोधकांसाठी सुपरमॅन ठरले आहेत. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दरवाजे उघडून पटापट खाली उड्या मारल्या. अर्थात मुख्यमंत्र्यांसारख्या ‘व्हीआयपी’चे जीवन दगदगीचे असते व सततच्या धावपळीसाठी ते सरकारी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर करीत असतात, पण सरकारी हेलिकॉप्टर्स खरोखरच सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न निलंग्याच्या निमित्ताने उत्पन्न झाला आहे. दोन महिन्यांत हे हेलिकॉप्टर तिसऱ्यांदा बिघडले. यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही याच हेलिकॉप्टरने दगा दिला होता हे विसरता येत नाही. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ाच्या दौऱ्यावर असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता व त्यांना त्या दुर्गम भागातून पुढे मोटारीने प्रवास करावा लागला होता. साताऱ्यात व नागपुरातही हेलिकॉप्टर बिघडले होते. त्यामुळे अशा प्रवासाच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. त्या अति फिरण्याचा ताण सरकारी हेलिकॉप्टरवर आला असेल तर त्यांच्या जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था का होऊ नये? मुख्यमंत्र्यांना आज त्यांच्या पक्षात तसे कुणाचेच आव्हान दिसत नाही. त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेण्याचे ठरवले असले तरी ते इतरही अनेक भूमिकांत आहेत. ते सुपुत्र आहेत, पिता आहेत, पती व बंधू आहेत तसेच अनेकांचे मित्र आहेत. या नात्याने त्यांच्यावरील संकटाची काळजी सगळ्य़ांनाच वाटू शकते. मुख्यमंत्र्यांनी अधिक काम करण्यासाठी ‘फिट’ राहण्याचे मनावर घेतले आहे. आता ‘सुरक्षित’ राहण्याचेही मनावर घेतले पाहिजे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे आपल्या पूर्वजांनी का म्हटलेय ते त्यांनी समजून घेतले तर आम्हाला काय म्हणायचे आहे ते त्यांना समजेल. पंतप्रधान मोदींच्या सरकारला तीन वर्षे होत असल्याचा उत्सव देशभरात सुरू झाला असतानाच मुख्यमंत्र्यांच्या निलंगा अपघाताची बातमी आली. मुख्यमंत्री सुखरूप आहेत व राहतील. त्यामुळे मोदी उत्सवात त्यांना सहभागी होता येईल. श्री. फडणवीस यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करीत आहोत.