मुंबई : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात जसे त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतकºयांच्या हातात पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपीटग्रस्त शेतकरी गुन्हेगार आहेत का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.खा. चव्हाण म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकोंडी गावातील शेतीचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यावर सरकारी मदत मिळेल या आशेवर शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत होते. पंचनामा करायला आलेल्या अधिकाºयांनी गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना पिकात उभे करून त्यांच्या हातात नाव लिहिलेली पाटी देऊन गुन्हेगाराप्रमाणे त्यांचे फोटो काढले. पंचनामे करताना या अधिकाºयांनी महिला शेतकºयांच्या हातातही आरोपीसारख्या पाट्या देऊन फोटो काढले. सरकारने ही क्रूर थट्टा चालवली आहे, असे खा. चव्हाण म्हणाले. गारपिटीत मृत्यू झालेली जनावरे पोस्टमार्टम करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या, असे फर्मान तेथील तलाठ्यांनी आणि अधिकाºयांनी काढले. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यावर जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन ही तुघलकी फर्माने मागे घेऊन संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुलतानी पंचनामे करून सरकार जखमेवर मीठ का चोळते, असा सवालही त्यांनी केला.मराठवाडा आणि विदर्भात गारांचा पाऊस पडून पंधरवडा उलटत नाही तोच आता पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ फेब्रुवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तर २४ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. गारांच्या पावसाचा इशारा देतानाच २२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २३ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. २४ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचे आकाश निरभ्र राहील. बुधवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २१ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गारपीटग्रस्त शेतकरी गुन्हेगार आहेत का?, अशोक चव्हाण यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:53 AM