ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 02:46 PM2023-02-17T14:46:35+5:302023-02-17T14:47:24+5:30
मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी पक्षीय राजकारणावर भाष्य केले होते. तिथेच बाळासाहेब थोरात यांनीही पक्षांतर्गत वादातून तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असं म्हटलं होते. त्यामुळे काँग्रेसमधील पटोले-थोरात वाद समोर आला होता. त्यातच या वादाचा फायदा घेत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्याला अशोक चव्हाणांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, मित्रत्व वेगळे आणि पक्षीय विचारसरणी यात फरक आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण संबंध आहेत म्हणून त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी माझे समान मत असेल असं मानायचं कारण नाही. विखे पाटलांच्या सदिच्छेबद्दल आभार परंतु मी कुठलाही विचार किंवा निर्णय घेतला नाही. याआधीही मी अनेकदा यावर भाष्य केले आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ते माझे मित्र आहेत की शत्रू आहेत हाच खरा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस पक्षात काही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का याची शंका येते. मी त्यांना शुभेच्छा देतो मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला सल्ला मला अमान्य आहे असं स्पष्ट शब्दात सांगत अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याची ऑफर नाकारली आहे.
काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं काँग्रेस पक्षात काहीच भवितव्य नाही. त्यांचे भवितव्य अंधारमय आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करावा. लवकरच काँग्रेसचा कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसमध्ये भविष्य नाही. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वात काम करायला हवं असं विधान करत राधाकृष्ण विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना थेट भाजपात येण्याची ऑफर दिली होती.