आज विधानसभेत बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते. यावेळी विरोधी पक्षातील नेते ठाकरे गट, शरद पवार गटातीन नेते आपल्या जागा सोडून गप्पांची मैफिल रंगवत होते. यावर संतप्त झालेल्या कडू यांनी आदित्य ठाकरे, जाधव यांचे नाव घेऊन जुगार अड्ड्यावर बसला आहात का? असा सवाल भर सभागृहात विचारला.
विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला. तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले आहोत. २४ तासांचे वीज बिल घेतात, ८ तासच वीज देतात. हे थांबवायला हवे. विजेच्या वायर घराच्या हातभर उंचावरून जातात. जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. चार-पाच लाखाची मदत, गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केलाय. आमदार खासदाराचे पोरगं मरत नाही ना म्हणून तिकडे लक्ष दिले जात नाहीय, अशी टीका कडू यांनी केली.
दुधामध्ये भेसळ केली जात आहे. हिंदू खतरेमे है, नाही दुधामुळे खतरेमे है. जाती धर्माच्या नावाने लढतायत. तुम्ही भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही का, कशाला हे सभागृह ठेवले आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. भ्रष्टाचाराचे एकूण प्रकार काढले तर जेवढे राज्याचे बजेट नाही त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार देशपातळीवर पाहतोय. यावर लक्ष दिले नाहीतर येणारा काळ वाईट असणार आहे, असा इशारा कडू यांनी दिला.
यावेळी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांकडे बोट दाखवून अध्यक्षांना कडू यांनी तिकडे वेगळे सभागृह सुरु असल्याचे म्हटले. जयंत पाटील, आव्हाड हे आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते. पुन्हा पुन्हा हे होताना पाहून आदित्य ठाकरे, जाधव हे शिवसेनेचे लोक एवढी चर्चा करतायत की हे सभागृहात आहेत की बाहेर बसलेत. जुगार अड्ड्यावर बसला आहात का? असा सवाल कडू यांनी विचारला. एकतर तुम्ही आम्ही तिकडे बसलो होतो, आता इकडे बसलोय आता तिकडे न्यायचा विचार आहे का, मी चारवेळा निवडून आलोय, अशा शब्दांत कडू यांनी ठाकरे गटाला फटकारले आहे.