"अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:49 PM2024-07-31T19:49:25+5:302024-07-31T19:50:11+5:30
NCP Ajit Pawar Criticize Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच यापुढे राज्याच्या राजकारणात एकतर तुम्ही तरी राहाल, नाहीतर मी तरी राहीन अशा निर्वाणीच्या भाषेत आव्हान दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार टीका केली आहे. ‘’अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते’ असा टोला अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असते त्यावेळी बोलली जाते. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना दगा दिला आणि युती तोडून महाविकास आघाडीत गेले. राजकारणात ऐनवेळी फसवल्यानंतर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळेच तुम्हाला मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, आपला पक्ष फुटला त्याचा राग व्यक्तिगत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढताय हे योग्य नाही असेही उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
उमेश पाटील पुढे म्हणाले की, लोकांसाठी वेळ देतो, परिश्रम घेतो, तोच राजकारणात टिकतो. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या गराड्यात असतात. तुम्ही मात्र घरात बसता. तुमच्या आमदारांना भेटण्यासाठी वेळ मागावी लागते. तुम्ही आमदार खासदारांना सहा सहा महिने भेटत नाही, असा टोला उमेश पाटील यांनी यावेळी लगावला.
शिवसेना का फुटली, त्याची कारणे काय आहेत. तुम्ही कोरोना काळात घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होतात. आमदारांना भेटायचे असते. आमदार हे तीन तीन लाख लोकांमधून निवडून येतात. बैठका घ्याव्या लागतात. त्यांना वेळ द्यावा लागतो. मात्र वेळ दिला नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणापासून तुम्ही दूर फेकले गेलात. राजकारणात टिकून राहण्यासाठी सातत्याने लोकांची कामे करावी लागतात. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असेही उमेश पाटील म्हणाले.
तुमची भूमिका महाराष्ट्राच्या भल्यासाठी असली पाहिजे. शिवसेना संघटना एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात व्यक्तिकेंद्रीत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे तुमच्याबद्दल विचार करावा लागेल, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.