जालना : युवा क्रिकेटपटू विजय झोल याच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून जालन्यातील आझाद मैदानावर अखिल भारतीय स्तरावर आमदार अर्जुन खोतकर चषक क्रिकेट स्पर्धा २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिवस-रात्र होणार असून या स्पर्धेस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत खेळाडू विशेष हजेरी लावणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.आ. अर्जुन खोतकर यांनी या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती दिली. स्पर्धेसाठी कुठल्याही वयोगटाची अट नसून खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी किमान ५० संघ सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातील खेळाडुंची राहण्याची व निवासाची व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. १९९० नंतर २०१५ मध्ये म्हणजे तब्बल २५ वर्षानंतर शहरात दिवस-रात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक संघांना एकच संधी दिली जाणार असून बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या संघांना मात्र तीनवेळा संधी दिली जाणार असल्याचे अभिमन्यू खोतकर यांनी सांगितले. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव, अंकित बावणे, मोशीन सय्यद, डॉमिनिक मुत्तेस्वामी तसेच अन्य खेळाडू उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते १ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी शिवसेना संपर्कनेते विनोद घोन्साळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. लेदरबॉलवर हे सामने खेळविण्यात येतील. इच्छुक संघांनी ऋषीकेष काळे किंवा संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, संतोष मोहिते यांच्यासह बाळासाहेब देशमुख, राजू काणे यांची उपस्थिती होती.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपयांचे असून, द्वितीय पारितोषिक ५१ हजार १११ रुपये आहे. स्पर्धेसाठी मॅन आॅफ दि सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
जालन्यात अर्जुन खोतकर चषक क्रिकेट स्पर्धा
By admin | Published: May 26, 2015 12:05 AM