मुंबई - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य हेच स्पर्धेत असल्याचे म्हटले जात होते. मात्र ऐनवेळी आतापर्यंत स्पर्धेत नसलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे शेवटच्या टप्प्यात आघाडीवर आले आहेत. तर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांसह दोन्ही जिल्ह्यांतील २० जणांशी चर्चा केली. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र अंबादास दानवे यांचे नाव निश्चित समजले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर खोतकर यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमदेवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर यावेळी शिवसेनेकडून त्यांचे नाव निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी आता अंबादास दानवे यांचे नाव पुढे आल्याने खोतकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. आज अधिकृत उमेदवाराची घोषणा होऊ शकते. मात्र अंबादास दानेवेंच्या नावाच्या चर्चेमुळे खोतकरांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.
आंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तर, खोतकर यांना विधानसभा वेतिरिक्त पर्याय उरणार नाही. तर लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नाही म्हणून रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खोतकरांची पुन्हा नाराजी वाढू शकते. त्यामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या युतीच्या उमेदवारीनंतर जालना जिल्ह्यातील राजकरण पुन्हा तापण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.