मुंबई - राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलाश गौरंट्याल यांच्यातील जालन्याची लढत राज्यात लक्षवेधी ठरते. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. मात्र यावेळी खोतकर विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चांमुळे गोरंट्याल यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार, अशी चर्चा जालना मतदार संघात सुरू आहे.
जालना, औरंगाबाद विधान परिषद जागेवरील उमेदवार काँग्रेसनेते सुभाष झांबड यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. मात्र विधान परिषदेच्या या जागेला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लाभली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावेळी खोतकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकर यांनी माघार घेतली. विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.
खोतकरांसाठी विधानसभा खडतरच
जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलाश गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. यावेळी स्थिती वेगळी असून खोतकरच विधान परिषदेवर जाणार या चर्चेमुळे गोरट्याल यांच्यासमोर विधानसभेला शिवसेनेचे की, भाजपचे आव्हान राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.