औरंगाबाद : मनोरुग्ण ठरवल्यामुळे तब्बल २० वर्षे काळकोठडीत घालवल्यानंतर अर्जुनला बुधवारी खंडपीठासमोर बोलण्याची संधी मिळाली खरी. मात्र, भावनाविवश झालेल्या अर्जुनच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. अर्जुन इंगळे. वय वर्षे ३९. मनोरुग्ण असल्याचे सांगत, पोलीस पाटील असलेल्या राजेंद्र इंगळे या सख्ख्या भावाने १९९८ पासून त्याला एका खोलीत डांबून ठेवले होते. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील हा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. मंगळवारी पोलीस पथकाने त्याची सुटका केली. खंडपीठाने ‘सुओ मोटो’ याचिका दाखल करून घेतली होती. राज्य शासन, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करून, नोटीस बजावून बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. बुधवारी न्या. ए. व्ही. निरगुडे व न्या. व्ही. के. जाधव यांच्या पीठाने अर्जुनची चौकशी केली. मात्र, तो नि:शब्द होता. एकही शब्द त्याने उच्चारला नाही. त्याने फक्त मान हलविली. सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी न्यायालयास सांगितले की, पोलिसांनी रीतसर पंचनामा करून अर्जुनची बंद खोलीतून सुटका केली. अर्जुनला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले, म्हणून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास चालू आहे. अर्जुनवर योग्य उपचार करून सर्व सुविधा पुरविण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनास दिले. तीन आठवड्यांनंतर त्याला खंडपीठासमोर हजर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
नि:शब्द अर्जुन !
By admin | Published: October 29, 2015 1:04 AM