आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २३ : सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे या दोन गुंडांनी मंगळवारी सकाळी भर रस्त्यात एकमेकांवर खुनीहल्ला चढविला. खुन्नस दिल्याच्या कारणावरून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, घटनेनंतर शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. शनिवार पेठ, कऱ्हाड) याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू जयपाल चांदणे व त्याचा चुलतभाऊ गोट्या ऊर्फ किशोर हरीभाऊ चांदणे (दोघेही रा. महात्मा फुले नगर, बुधवार पेठ, कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर बापू चांदणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भानुदास धोत्रेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास धोत्रे व गोट्या चांदणे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शहरातील शनिवार पेठेत राहणारा भानुदास धोत्रे हा सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अन्य गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी सल्या चेप्या गोळीबार प्रकरणाची येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सकाळी तो कऱ्हाडात आला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून भाजी मंडईकडून बसस्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी बापू चांदणे व भानुदास धोत्रे समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांवर खुनीहल्ला चढविला.
सुरी व अन्य धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केल्याने भानुदास धोत्रे व बापूचा चुलतभाऊ गोट्या चांदणे हे दोघेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तसेच न्यायालय परिसरासह प्रभात टॉकीज परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.डॉन झाला का म्हणत हल्ला! भानुदास धोत्रेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी भानुदास दुचाकीवरून जात असताना बापू चांदणे त्यांच्या अंगावर थुंकला. याबाबत भानुदासने त्याला जाब विचारला असता तू सल्यावर फायरिंग केले म्हणून स्वत:ला डॉन समजतोस का,असे म्हणत त्याने व त्याचा भाऊ गोट्याने भानुदासवर सुरीने हल्ला केला. त्यामध्ये भानुदासच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भानुदास म्हणाला तुला ठोकतो!बापू चांदणेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बापू चांदणे हा मंगळवारी सकाळी मंडईतून भाजी घेऊन घराकडे जात असताना भानुदास धोत्रे दुचाकीवरून आला. बापूकडे बघून ह्यतुला ठोकतो, असे म्हणत त्याने त्याला मारहाण केली. त्यावेळी गोट्या चांदणे भांडणे सोडविण्यास आला असताना भानुदासने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला.