- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘शक्ती’ नावाचे एक अॅप कार्यकर्त्यांसाठी आणले असून, त्या माध्यमातून राज्यात तब्बल ७ लाख कार्यकर्ते जोडले गेले आहेत. मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांचा, भाषणांचा भांडाफोड करणे, धर्मनिरपेक्ष विचाराचा प्रसार करणे आणि काँग्रेसचा जाहीरनामा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेसच्या वॉररूममधून सुरू आहे. राहुल गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेली उच्चशिक्षित तरुणांची फळी येथे दिवसरात्र राबताना दिसते.
मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची वॉररूम आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी हे या वॉररूमचे प्रमुख आहेत. अभिजीत सपकाळ यांनी या वॉररूमचा सेटअप तयार केला आहे. टिळक भवन येथे दोन मजल्यांवर जवळपास ५० ते ६० तरुण मुलामुलींची टीम चोवीस तास काम करत आहे. शेट्टी यांनी सांगितले की, आमच्याकडे पक्षाचे तरुण कार्यकर्तेच या कामात आहेत. मुंबई काँग्रेसच्या टीममध्ये तर एमबीए, इंजिनीअर असे उच्च शिक्षित तरुण आहेत. ते सगळे विनामोबदला काम करतात. पैसे देऊन ट्रोल करणारी किंवा खोटा प्रचार करणारी यंत्रणा आम्ही उभी केलेली नाही. काँग्रेस पक्षाने काढलेला जाहीरनामा सर्वसमावेशक असून त्यात युवकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी विकासाच्या योजनाआहेत. हा जाहीरनामा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, तसेचमोदी सरकारने केलेल्या खोट्या घोषणा, भाजपाच्या ट्रोल आर्मीकडून पसरविली जाणारी खोटी माहिती याचा भांडाफोड सोशल मीडियातून आमची टीम करत आहे.‘घर घर काँग्रेस’चेगुगलवरून नियंत्रणमुंबईत आम्ही एका ठिकाणी कॉलसेंटर उभारले आहे. त्यात जवळपास १२० ते १५० तरुण मुलेमुली काम करत आहेत. ‘शक्ती’ अॅपच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनाच आम्ही ‘घर घर काँग्रेस’ हे कॅम्पेन दिले आहे. आमचे कार्यकर्ते कोणत्या घरी गेले, तेथे ते कोणाला, कधी व किती वाजता भेटले, याची सगळी माहिती इथे मुंबईत बसून मिळते. आमच्याकडे ७ लाख कार्यकर्त्यांची माहिती गोळा झालेली आहे. आमचे कॉल सेंटर हे स्वत:हून काम करण्यासाठी आलेल्या उत्साही तरुणांचे आहे, पैसेवाल्यांचे नाही, असे अभिजीत सपकाळ यांनी सांगितले.बूथ समन्वयकांची फौजकाँग्रेसने बूथ समन्वयकांची फौज तयार केली आहे. ‘जीओ इर्न्फमेटीक सीस्टिम’ च्या साहाय्याने आम्ही राज्यातील सगळे बूथ गुगल मॅपद्वारे जोडले आहेत. त्यात आम्ही गेल्या १५ वर्षांची माहिती टाकलेली आहे. कोणता बूथ कसा आहे, तेथे कोणाला किती मतं मिळाली होती, आज तेथे काय परिस्थिती आहे, बूथवर कोण आहे याची सगळी माहिती एका क्लिकवर ठेवली आहे. त्या माहितीचा ‘अॅक्सेस’ आम्ही उमेदवारांनाही देऊ करत आहोत.ं‘लाज वाटत नाही...’ कॅम्पेनला प्रतिसादनरेंद्र मोदी सरकारने अनेक घोषणांपैकी प्रत्यक्षात त्यातील एकही घोषणा सत्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेसने ‘लाज वाटत नाही का?’ असे कॅम्पेन सुरू केले असून व्हिडीओ क्लीप आणि फोटोच्या माध्यमातून हे कॅम्पेन सोशल मीडियावर केले जात आहे. ‘बेरोजगारांचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढलाय, तरीही या सरकारला लाज वाटत नाही का?’, ‘मुली पळवण्याची भाषा करताना या सरकारला लाज वाटत नाही का?’, ‘फसव्या योजनांनी आया बहिणींच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्यांना स्वत:चे हसरे फोटो पेट्रोलपंपावर लावताना लाज वाटत नाही का?’, ‘शिक्षणाचा विनोद करून विकासाच्या बाता मारणाऱ्यांना लाज वाटत नाही का?’ अशा जाहिराती वॉररूममधून राज्यभर पाठविल्या जात आहेत. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या भाजपच्या जाहीरातींना हे चोख उत्तर आहे, असे सुरेश शेट्टी यांनी सांगितले.