मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना व भाजपाच्या मैत्रीमधील दरी रुंदावत चालली असून आता ते हमरीतुमरीवर उतरल्याचे चित्र आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात लेखा विभागातील खासगी संस्थेच्या दहा अधिकाऱ्यांना बुधवारी मध्यरात्री अटक झाल्यानंतर आता कंत्राटदारांना पाठीशी घालणारे व ‘करून दाखविले’ म्हणणारेही आत जातील, असा हल्ला चढवत भाजपाने शिवसेनेच्या वर्मावरच वार केला. यामुळे संतापलेल्या शिवसेनेनेही आधी भाजपाने दानवे, खडसे, महाजन यांची प्रकरणे बघावीत, असा प्रतिहल्ला चढवत भाजपाच्या स्थानिक नेत्यांची डरपोक या शब्दांत संभावना केली. मुंबईतील ३४ रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली आहे़ सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे़ त्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी बुधवारी रात्री संतोष तुळशीराम कदम (४२), अहफाक मन्सुरअली सय्यद (२६), मिलिंद तेजमल कुमावत (२६), राकेश शंकर मेरवाडे (३४), पवनकुमार ओमप्रकाश शुक्ला (२६), प्रेमाचंद शिवाजी धनवडे (३७), मंगेश हरीभाऊ तळेकर (३३), शिरज देवरावजी फुलझेले (४०), राहुल शिंदे (२९), धैर्यशिल हिंदुराब पाटील (३३) या खासगी संस्थेच्या १० लेखा परीक्षकांना अटक केली. आता यापुढची कारवाई पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर होण्याची शक्यता आहे. या अटकेनंतर अॅड़ आशीष शेलार यांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेवर हल्ला चढविला. शिवसेनेनेही त्यास तात्काळ प्रत्युत्तर देत, त्यांनी आधी आपल्या नेत्यांची प्रकरणे बघावीत़, असा टोला लगावला. त्यामुळे आता दोन्ही पक्ष हमरीतुमरीवर उतरल्याचे दिसते. (प्रतिनिधी)भाजपाचा हल्लाहा घोटाळा उघड करण्यासाठी भाजपानेच पहिल्यापासून पाठपुरावा केला, असा दावा करीत अॅड़ शेलार यांनी या चौकशीचे श्रेय भाजपाच्या खिशात घातले आहे़ तसेच ठेकेदारांना पाठीशी घालणारे व ‘करून दाखविले’ म्हणणारे आत जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.शिवसेनेचा प्रतिहल्लाशेलार भविष्य पाहायला लागले आहेत का, पण शिवसेना कधी भविष्यात रमत नाही, वर्तमानात रमते़ दानवे, महाजन, खडसे यांची प्रकरणे भाजपाने बघावीत़ ‘करून दाखविले’ असे म्हणणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास शेलार यांना भरपूर अवधी आहे, असे आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे़ तर नाव न घेता शिवसेनेवर टीका करणारे शेलार हे डरपोक आहेत, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
सेना-भाजपा हमरीतुमरीवर
By admin | Published: June 17, 2016 6:06 AM