ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 12 - शेतक-यांची अवहेलना करणारे विधान केल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अडचणीत सापडले आहेत. शिवाय, या वादावरुन सत्तेतील दोस्तांमध्ये कुस्ती सुरू आहे. तूर खरेदीवरुन दानवे यांनी शेतक-यांना अपमानीत करणारे विधान केल्याप्रकरणी शिवसेनेनं दानवेंविरोधात एल्गार पुकारला आहे. मात्र, नव्या कारणावरुन शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत.
गुरुवारी राज्यभरात शिवसेनेनं दानवेंविरोधात निषेध आंदोलन केलं. या निषेध आंदोलनामुळे भाजपा-शिवसेनेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवलीमध्ये तर भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या शहरप्रमुखाला काळं फासण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यानंतर शिवसेनेकडून भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले.
गुरुवारी सकाळी डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढली, जोडो मारो आंदोलन केले. या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपाने "सामना" या शिवसेनेच्या मुखपत्राच्या काही प्रतींची होळी केली. तसेच भाजपच्या कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष महेश पाटील यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या चेह-याला काळं फासण्याचाही प्रयत्न केला. यानंतर तणाव अधिक वाढला व शिवसेनेनं भाजपा कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस ठाण्यात शिवसेनेचा ठिय्या
यानंतर, शिवसेनेच सर्व पदाधिकारी रामनगर पोलीस ठाण्यात जमले तेथे त्यांनी ठिय्याच मांडला. यावेळी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्केही पोलीस ठाण्यात दाखल झाले होते . शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी पोलिसांत घडल्याप्रकाराबाबत तक्रार नोंदवली. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपाच्या कल्याण ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील यांना तासाभरात पोलीस ठाण्यात आणा, अन्यथा आम्ही दोन तासांत आणतो, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांकडे लावून धरली होती.
दरम्यान, याप्रकरणी भाजपाच्या महेश पाटील यांच्यासहीत 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलनं आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.