मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार असून, हा शासकीय कार्यक्रम भाजपाने हायजॅक केल्याने विरोधकांसह मित्रपक्षांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली. श्रेयवादावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेत शुक्रवारी चांगलीच राजकीय धुळवड रंगली.शिवसेना भवनासमोरील कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर रातोरात भाजपाचा बॅनर रंगवण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि त्यानंतर होणाऱ्या सभेच्या या जाहिरातीला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनीही रातोरात पोस्टर झळकाविले. ‘शिवस्मारक व्हावे, हीच बाळासाहेबांची इच्छा’ असा संदेश असणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले. शिवसेना-भाजपातील या श्रेयवादात मनसेनेही उडी घेतली. ज्या भिंतीवर भाजपाने जाहिरात रंगवली ती भिंत मनसेची असल्याचा दावा करत मनसैनिकांनी जोरदार आक्षेप घेतला. भाजपाची जाहिरात पुसून टाकून मनसैनिकांनी ती अख्खी भिंतच कापडाने झाकून टाकली. एकीकडे जाहिराती आणि पोस्टरवरुन शिवसेना-भाजपा आणि मनसेत कलगीतुरा सुरु असताना चेंबूर येथून सुरु होणाऱ्या शोभायात्रेतही मानापमान नाट्य रंगले. स्मारकासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून नद्यांचे जल आणि मातीचे कलश शुक्रवार सकाळी मुंबईत दाखल झाले. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन शोभायात्रेच्या माध्यमातून हे सर्व कलश गेट वे आॅफ इंडियाकडे नेण्यात आले. मात्र, शोभायात्रेच्या निमित्ताने भाजपा निव्वळ शक्तिप्रदर्शन करीत आहे. कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात असल्याचा थेट आरोप करत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली.कलशयात्रेमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असे भाजपाचे दिग्गज नेते-मंत्री सहभागी झाले. मात्र, शोभायात्रेत केवळ भाजपा नेत्यांनाच प्राधान्य मिळत असल्याने मेटेंनी शोभायात्रेचा कार्यक्रम अर्ध्यात सोडून जाणे पसंत केले. (प्रतिनिधी)आज शिवसेनेचेही शक्तिप्रदर्शन!-राज्यातील विविध नद्यांचे पाणी आणि गडकिल्ल्यांच्या मातीचे कलश आज मुंबईत फिरवून भाजपाने उद्याच्या शिवस्मारक भूमिपूजन समारंभावरील आपली छाया अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला असतानाच शिवसेनाही शक्तिप्रदर्शन करणार आहे. उद्याच्या बीकेसीतील समारंभाला पक्षाचे आमदार आणि विभागप्रमुखांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करावे, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एका बैठकीत दिले. ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा होती. आज भाजपा या स्मारकाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी धडपडत आहे. शिवराय हे आमचे दैवत आहेत आणि त्यांना आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही. उद्याच्या बीकेसीतील कार्यक्रमाला शिवसैनिकांनी शिवरायांवरील आपली श्रद्धा दाखवायलाच हवी, असे उद्धव यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सेना-भाजपात शहकाटशह
By admin | Published: December 24, 2016 5:15 AM