देवराम भेगडे
(पिंपरी चिंचवड) : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने आजपासून पंढरीकडे आगेकूच केली असून चिंचोलीचा विसावा आणि जेवण घेत आकुर्डीकडे मार्गक्रमण सुरु केले आहे. सध्या देहूरोड येथे असलेल्या पालखीचे लष्कराने जंगी स्वागत केले आहे. ज्ञानेश्वर माउली,ज्ञानराज माउली तुकाराम नामजयघोष करीत लाखो वारकऱ्यांनी खांद्यावर भगवी पताका,डोक्यावर तुळशी , हातात टाळ आणि मुखात हरिनाम देहूतून भल्यापहाटे चालण्यास सुरुवात केली. वाटेत सर्वत्र भजन,अभंग,टाळ,मृदंगाचे सूर आणि भगवंतांचा जयघोष सुरु होता. देहूतून निघाल्यावर अनगडशहा बाबांच्या स्थानासमोर अभंग आरती करण्यात आली.
त्यानंतर चिंचोली येथे पहिला विसावा घेण्यात आला. यावेळी पालखीवर चिंचोलीच्या ग्रामस्थ आणि शनि मंदिर देवस्थानकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. देवस्थान अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांचे हस्ते आरती संपन्न झाली. तिथे विविध दिंडीतील वारकऱ्यांची ग्रामस्थांकडून भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यंदा प्लास्टिक बंदी असल्याने पत्रावळीवर वारकऱ्यांना जेवण देण्यात आले. सुदैवाने पावसाने विश्रांती घेतल्याने जेवताना कोणताही व्यत्यय आला नाही. पालखीने मुक्कामाचे ठिकाण असलेल्या आकुर्डीकडे वाटचाल सुरु केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखीच्या वाटचालीचे ठळक मुद्दे
- देहू येथून सकाळी आकुर्डीकडे मार्गक्रमण सुरू
- चिंचोली येथे पहिला विसावा,शनि मंदिर देवस्थानकडून पालखीवर पुष्पवृष्टी
- देवस्थान अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांचे हस्ते आरती संपन्न, पालखी प्रमुखांचा केला सत्कार
- विविध दिंडीतील वारकऱ्यांची ग्रामस्थांकडून भोजन व्यवस्था :दानशूर व्यक्ती , विविध संस्थाकडून अन्नदान सुरू
- साखळी चोरांना रोखण्यासाठी पोलीसांचे विशेष पथक