औरंगाबाद : काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या औरंगाबादेतील सहा तरुणांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. हे तरुण सध्या परतीच्या वाटेवर आहेत. यामध्ये औरंगाबादेत शिक्षण घेत असलेल्या दोन इराकी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीर राज्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुरात सापडल्यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अजूनही हजारो लोक ठिकठिकाणी पुराने वेढले आहेत. त्यात औरंगाबादेतून पर्यटनासाठी गेलेले मोहम्मद शाहेद मोहम्मद अमीन (२४), असेम सिद्दीक (२०), मोहम्मद तहा अब्दुल रऊफ (१८), एहतेशाम अहमद (२०), मुस्तफा (२४) आणि झैद खलील इस्माईल (२५) हे बेपत्ता झाले होते. श्रीनगर शहरास पाण्याने वेढल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र, आता या चारही जणांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत.श्रीनगर शहरातील गव्हर्नर हाऊस भागातून भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली आहे. लष्कराच्या जवानांनी वाचविल्यानंतर हे तरुण दिल्लीमार्गे औरंगाबादच्या दिशेने प्रवासासाठी निघाले आहेत. सहापैकी मुस्तफा आणि झैद खलील इस्माईल हे दोघे इराकी विद्यार्थी असून, ते औरंगाबादेत एमपीएडचे शिक्षण घेत आहेत. हे दोघे स्वतंत्रपणे पर्यटनासाठी गेले होते. तर उर्वरित चौघे एका गटात होते. या चौघांमधील तिघे जण मौलाना आझाद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. (प्रतिनिधी)
लष्कराने केली औरंगाबादच्या सहा तरुणांची सुखरूप सुटका
By admin | Published: September 13, 2014 2:54 AM