ठाणे : बिल्डर सूरज परमार यांची संपूर्ण डायरी लोकांसमोर ठेवावी, त्यामध्ये शिवसेना नेत्यांची आणि बगलबच्च्यांची नावे आहेत किंवा कसे, तेही तपासावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली. नजीब मुल्ला व हणमंत जगदाळे हे चुकीचे काम करणाऱ्यांचे बुरखे फाडत होते. त्यांनाच या प्रकरणात हेतुत: गोवल्याचा दावा करीत परमार प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्नही पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पवार बोलत होते. ते म्हणाले की, बिल्डरांचा व व्यापाऱ्यांचा धंदा बसला आहे. त्यांच्या आत्महत्या होत आहेत. परमार प्रकरणातील ती डायरी लोकांसमोर ठेवली गेली पाहिजे. मंत्रालयातील काही लोकांकडून समजले की, या सरकारमध्ये कुणावर केसेस करायच्या, याचे निर्णय तेथूनच होतात. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात, हे भाजपाने विसरू नये. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांच्यावर परमार प्रकरणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली असता ते म्हणाले की, आम्हीही १५ वर्षे सत्तेत होतो. आम्ही अशा पद्धतीने आकसपूर्ण कारवाई केली नाही. परमार यांच्या डायरीमधील केवळ एकच पान दाखवण्यात आले. इतर कुणाची नावे आहेत, ते जनतेसमोर आले पाहिजे. (प्रतिनिधी)सिंचनाबाबत बाळगले मौनराज्य सरकारने मागील सरकारच्या काळातील सिंचन प्रकल्पांबाबतचे काही निर्णय रद्द केले याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सिंचन प्रकल्पांची जी चौकशी सुरू आहे, त्याला आम्ही संपूर्ण सहकार्य करीत आहोत. ते यापुढेही राहील. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण या विषयावर अधिक भाष्य करणार नाही.समविचारी, निधर्मी पक्षांसोबत आघाडीयेत्या महापालिका निवडणुकीत समविचारी, निधर्मी पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसबरोबर आघाडी असून आगामी निवडणुकीतही समविचारी पक्षांबरोबर जाण्याचा निश्चितच विचार आहे.एकाच पिस्तुलातून तिघांची हत्यानरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि कलबुर्गी या तिघांची हत्या एकाच पिस्तुलातून करण्यात आल्याचे विदेशी तपासयंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. मात्र, ही बाब आपल्या तपास यंत्रणांच्या लक्षात कशी आली नाही, असा सवाल पवार यांनी केला.
परमारच्या डायरीत सेना नेते?
By admin | Published: September 01, 2016 5:40 AM