पाठिंब्याचे घोंगडे भिजतच : विरोधी पक्षनेतेपदावर दावा, सत्तेसाठी चर्चेचीही तयारी
मुंबई : भाजपा आणि शिवसेनेतील वाढत्या दुराव्याच्या पाश्र्वभूमीवर विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू होताच शिवसेनेने आणि काँग्रेसनेही विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. विरोधी बाकांवर बसण्याच्या याच भूमिकेवर शिवसेना विश्वासदर्शक ठरावार्पयत ठाम राहिली तर भाजपाला ठराव मंजूर करवून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याखेरीज कुठलाही पर्याय राहणार नाही. किंबहुना त्यामुळेच भाजपाचे अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला. 12 तारखेला विश्वास मताच्या वेळी सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी एकतर्फी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. अशावेळी भाजपा आपल्याला चर्चेत गुंतवून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देऊ शकते. तसे झाले तर शिवसेनेची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होऊ शकते; त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे, असे स्पष्ट करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा म्हणत असेल तर शेवटच्या क्षणार्पयत चर्चा सुरू राहू शकते, असे सांगून संदिग्धता कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले पत्र घेऊन गटनेते एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, डॉ. नीलम गो:हे यांनी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांची भेट घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारे ते पत्र सादर केले.
भाजपाच्या 122 सदस्यांनंतर 63 सदस्यसंख्या असलेला शिवसेना हा दुस:या क्रमांकाचा पक्ष असल्याने शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा नवीन विधानसभा अध्यक्षांना स्वीकारावा लागेल, असे चित्र आहे. एकनाथ शिंदे हे त्या पदाचे दावेदार असतील.
सरकार पडणार नाही - मुख्यमंत्री
राज्यातील भाजपाचे सरकार 12 तारखेला विश्वासमत निश्चित जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. विधान भवनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हे सरकार पडावे आणि पुन्हा निवडणूक व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. भाजपा फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्याची गरजदेखील नाही. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल. नागपूर अधिवेशनाला सामोरे जाताना आमची टीम मोठीच असेल, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार टिकवण्यास राष्ट्रवादीचे सहकार्य घेण्यासंबंधी सुस्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन भाजपाला केले होते. मात्र भाजपाकडून कुठलेच स्पष्टीकरण न मिळाल्याने सेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या
डॉ. नीलम गो:हे यांनी स्पष्ट केले.
विखे-पाटील काँग्रेसचे गटनेते
काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली.
अध्यक्षपदासाठी बागडे
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे माजी मंत्री व औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते मंगळवारी उमेदवारी अर्ज भरतील.
विधान भवनात ‘हिरव्या
टोपी’चे राजकारण
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपात शाळेमध्ये उर्दू भाषा शिकविण्यावरून चकमक झडली. महसूल व अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांच्या, मराठी शाळेत उर्दू भाषा शिकविण्याच्या भूमिकेचा निषेध करत सेना नेते दिवाकर रावते यांनी खडसेंना भेट म्हणून हिरवी टोपी आणली.
42 सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याकरिता भाजपाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व त्यांना सत्तेत वाटा दिला तर शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावरील दावा मागे घेऊ शकते. अशा स्थितीत काँग्रेसकडे हे पद सोपवले जाऊ शकते.
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून आता या महापालिकेतील सत्तेवर भाजपाचा डोळा आहे. शिवसेनेची सहनशीलता म्हणजे लाचारी नाही. - उद्धव ठाकरे