युतीत नवा कलह : ‘नतमस्तक’ मोदींच्या फोटोमुळे वाद
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे नतमस्तक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेले एक पोस्टर बुधवारी सकाळी दादर येथे शिवसेना भवनच्या बाहेर झळकल्याने भाजपा-सेना युतीतील कलहात भर पडली.सत्तेत भागीदारी असलेल्या या दोन पक्षांची अवस्था वास्तवात ‘जानी दुश्मना’सारखी आहे, हे काही दिवसांतील घटनांवरून स्पष्ट झाले, परंतु बुधवारच्या या पोस्टरने शिवसेनेच्या मनातील सल व्यक्त होण्यासोबत अगतिकताच अधिक प्रकर्षाने चव्हाट्यावर आली, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. या पोस्टरची चित्रे सोशल मीडियावर पसरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर व पोस्टर लावण्याचा हेतू सफल झाला, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने धूर्तपणे हात झटकले. पोस्टर काढून टाकण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून निघाले नाहीत. शिवसेनेचे हे अधिकृत पोस्टर नाही. शिवसैनिकांनी कदाचित रागाच्या भरात ते लावले असेल. माध्यमांनी त्यावर अधिक चर्चा करू नये, असे पत्रकही शिवसेनेकडून काढले गेले. अर्थात, दुपारनंतर हे पोस्टर काढून टाकले गेले.पोस्टरचे पालकत्व नाकारून शिवसेनेने विश्वामित्री पवित्रा घेतला असला, तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिभेला दसरा मेळाव्यात किती विखारी धार चढते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.पोस्टरवरील छायाचित्रांपेक्षा त्यावरील मजकूर खास शिवसेना शैलीतील शालजोडा होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे नतमस्तक झालेल्या मोदींच्या छायाचित्राच्या बाजूला ठळक अक्षरात लिहिले होते, ‘विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या त्यांच्या गर्विष्ठ माना, साहेबांच्या चरणी! फक्त बाळासाहेब.’बाळासाहेबांपुढे अनेक आदराने झुकलेलेनाही म्हणायला, आज जे शिवसेनेपासून दुरावले आहेत, अशा अनेकांची बाळासाहेबांपुढे आदराने झुकलेल्या ‘पोझ’मधील छायाचित्रे पोस्टरवर होती. त्यात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, लालकृष्ण आडवाणी, राज ठाकरे व नारायण राणे यांचा समावेश होतो, परंतु पोस्टर लावली जाण्याची वेळ व त्यातील मजकुराचा संदर्भ पाहता, ते भाजपाला थप्पड मारण्यासाठीच होते, हे लपून राहिले नाही.े पोस्टर सेनेच्या ईशान्य मुंबई विभाग व घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातर्फे लावले गेले होते व खाली लीलाधर डाके, राजेंद्र राऊत व प्रतिभा चव्हाण यांची नावे होती.शिवसेनेला अशी पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. शिवसेनेला स्वत:चे मुखपत्र आहे. शिवसेना नेतेही जे काही बोलायचे ते आडून नव्हे, तर तोंडावर बोलत असतात. त्यामुळे हे पोस्टर अधिकृत नाही, पण शिवसैनिकांच्या त्या भावना असू शकतात, नव्हे आहेतच. - संजय राऊत, खासदार, शिवसेनाशिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून जे काही सांगायचे ते स्पष्ट केले आहे. भाजपा नेत्यांच्या वागण्यातील फरक त्यात स्पष्ट केला आहे.- मनोहर जोशी, शिवसेना नेते