नाशिक : कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना शुक्रवारी मारहाण केली. त्यानंतर पांडे यांनी जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुखांना हटविण्याची तयारी केली खरी, परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होताच पांडे यांचे बंड थंड झाले आहे. शुक्रवारचा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे पांडे यांनी आता म्हटले आहे. पांडे यांना प्रभाग तेरामधून तर प्रभाग २४ मधून त्यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, तसेच भावजय विद्यमान महिला नगरसेवक कल्पना पांडे अशा तिघांना उमेदवारी पाहिजे होती. पैकी ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडे यांना उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच वादाला सुरुवात झाली. अजय बोरस्ते तसेच जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अन्य इच्छुकांकडून लाखो रुपये घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप झाला. त्यानंतर बोरस्ते आणि करंजकर यांच्यावर पांडे समर्थकांनी हल्ला करून मारहाण केली होती. बोरस्ते समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. नाशिकच्या राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पांडे यांना तातडीने मुंबईला पाचारण केले होते. त्यांनी समर्थकांसह ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पांडे यांनी बोरस्ते- करंजकर हटावची भूमिका मागे घेतली. एवढेच नव्हे शुक्रवारचे वाद गैरसमजुतीतून झाल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)माझ्या भावना उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. काही गोष्टी गैरसमजुतीतून घडल्या आहेत. माझ्या मुलाने किंवा भावजय कल्पना पांडे यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली, परंतु ती स्वीकारलेली नाही. गैरसमज दूर झाले आहेत.- विनायक पांडे, माजी महापौर, शिवसेना
सेनेतील बंड झाले थंड!
By admin | Published: February 05, 2017 1:23 AM