मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेने प्रयत्न केला होता. मात्र ज्याच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली होती तो पकडला गेल्याने डाव फसला, अशी कबुली अमेरिकन-पाकिस्तानी एलईटी आॅपरेटीव्ह डेव्हिड हेडली याने गुरुवारी उलटतपासणीवेळी दिली. मात्र, नंतर तो पोलीस कोठडीतून पसार होण्यात यशस्वी ठरल्याचेही हेडलीने सांगितले. शिवसेना भवनला दोनदा भेट दिल्याचे हेडलीने कबूल केले. मात्र नक्की कोणत्या वर्षी ही भेट दिली, हे तो सांगू शकला नाही. ‘एलईटीचे लक्ष्य शिवसेनाप्रमुख होते... त्यांचे नाव बाळ ठाकरे. संधी मिळेल, तेव्हा एलईटीला त्यांना मारायचे होते. बाळ ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होते, एवढेच मला माहीत आहे. मला याबद्दल थेट माहिती नाही, परंतु ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न एलईटीने केला होता. याची जबाबदारी त्यांनी एकावर सोपविली होती. मात्र जबाबदारी पार पाडायच्या आधीच त्याला अटक करण्यात आली. तरीही तो पोलिसांच्या ताब्यातून सुटण्यात यशस्वी झाला, एवढेच मला माहीत आहे,’ असे हेडलीने अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी घेतलेल्या उलटतपासणीवेळी सांगितले. ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणत्या व्यक्ती एलईटीच्या रडारवर होत्या, हे माहीत नसल्याचे हेडलीने न्या. जी. ए. सानप यांना सांगितले. हेडलीची उलटतपासणी शुक्रवारीही सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी) आयएसआयकडून आर्थिक रसद...मुंबईवरील हल्ल्यासाठी काही ठिकाणांची रेकी करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली? अशी विचारणा अॅड. खान यांनी हेडलीला केली. त्यावर हेडलीने २६/११च्या हल्ल्यासाठी आयएसआयने आर्थिक मदत केल्याचे न्यायालयाला सांगितले.‘मुंबईत रेकी करण्यासाठी मला आयएसआयने सर्व आर्थिक मदत केली. मी त्यांच्याकडे पैसे मागितले नाहीत. या रेकीसाठी ३० ते ४० लाखांपेक्षा अत्यंत कमी खर्च आला,’ असे हेडलीने न्या. जी. ए. सानप यांना सांगितले. अल-कायदासाठी काम...२६/११च्या हल्ल्यानंतरही मार्च २००९मध्ये हेडली भारतात आला होता. या वेळी त्याला रेकीसाठी अल-कायदाने पैसे दिले होते. इलियास कश्मिरीने या दौऱ्यासाठी १ लाख रुपये दिल्याचे हेडलीने स्पष्ट केले. ‘२६/११च्या हल्ल्यानंतर एलईटीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येत होता. मात्र एलईटी भारतासाठी ‘सॉफ्ट’ झाले, असे म्हणणे अयोग्य आहे. ते डेन्मार्कसंदर्भात (मिकी माऊस) ‘सॉफ्ट’ झाले आणि त्यामुळेच मी एलईटीमधून अल-कायदासाठी काम करायचे ठरवले,’ असेही हेडलीने म्हटले.हल्ल्यातील मृतांचा उल्लेख ‘कार्टून’...२६/११ हल्ल्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या साजियाने हेडलीला मेल पाठवला. त्यात तिने मृतांचा व जखमींचा उल्लेख ‘कार्टून’ असा केला आहे. ‘मी कार्टून पाहत आहे. तुझा अभिमान आहे. अभिनंदन!!!’ असा मेल साजियाने हेडलीला पाठवला होता.
लष्करने केला होता बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 25, 2016 3:57 AM