ऑनलाइन लोकमतउदगीर, दि. 26 - उदगीर आणि देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला. एकट्या देवणी शहरातच १० दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तर उदगीरच्या मोंड्यातील ४ अडत दुकाने चोरट्यांनी फोडली. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.देवणी शहरातील उदगीर-निलंगा राज्यमार्गापासून ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील प्रमुख दुकाने चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास फोडली. थंडीचा कडाका वाढल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी एकापाठोपाठ मुख्य बाजारपेठेत धुमाकूळ घातला. त्यात प्रामुख्याने ज्वेलरीतून मोठा ऐवज गेला आहे. फिर्यादी राजकुमार पंचाक्षरे यांचे मुख्य बाजारपेठ लाईनमध्ये ज्वेलरी दुकान आहे. येथे चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील साहित्याची तोडफोड करीत ५ किलोग्रॅम वजनाचे चांदीचे मोड, तीन किलोग्रॅम चांदी, मोबाईल व काही रोख, असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. त्यापाठोपाठ बस्वराज काळू यांच्या ज्वेलरीतून रोख १० हजार व ५५ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज ६५ हजार रुपयांचा चोरीस गेला आहे. महादेव बिरादार यांच्या किराणा दुकानातून रोख ३८०० रुपये चोरीस गेले आहेत. किशोर बेलुरे यांच्या जनरल स्टोअर्समधून रोख ३० हजार व ३५ हजार रुपयांचे मोबाईल व्हाऊचर्स असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. रफीक शेख यांच्या मोबाईल दुकानातून १६ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीस गेले आहेत. महादेव बेलुरे यांच्या किराणा दुकानातून रोख ५ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीचे साहित्य असे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविण्यात आला. संतोष चिंद्रेवार यांच्या किराणा दुकानातून रोख १० हजार रुपये, अविनाश धनुरे यांच्या कापड दुकानातून १५०० रुपये चोरीस गेले आहेत.याशिवाय, बाजारपेठेतील साई ज्वेलर्स, श्री ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स, अभिजीत ज्वेलर्स, शिवशक्ती मॉल, तपोवन गिफ्ट सेंटर या दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथे त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एस. एन. सांगवीकर करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवणी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करून त्याद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवान राज्यमार्गापर्यंत जाऊन तेथेच घुटमळले. तपासासाठी दोन पथकेदेवणी शहरातील घडलेल्या दुकानफोडीच्या घटनांनंतर तातडीने दोन तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके आरोपींच्या शोधार्थ बाहेर रवाना झाली आहेत. ठसे तज्ज्ञांकडून क्ल्यू मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एका सीसीटीव्हीमध्ये दोघांचे चेहरे कैद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील यांनी दिली आहे. उदगीरात चोरट्यांचे हात रिकामेउदगीरच्या मोंढ्यातील चार अडत दुकाने चोरट्यांनी फोडली. परंतु एकाही दुकानात त्यांच्या हाती काही लागले नाही़. सकाळी हे अडत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र चोरीस काहीच गेले नसल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांत कसलीही नोंद झाली नाही. दरम्यान, शहरातील दुकान फोडीचे प्रकार वाढत चालल्याने कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असल्याचे पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.
उदगीर-देवणीत रात्रीतून फोडली १४ दुकाने
By admin | Published: December 26, 2016 5:21 PM