सासवड : पुरंदरमधील चांबळी येथील हद्दीतील चांबळी-कोडीत रस्त्यापासून काही अंतरावर असणाऱ्या वाकण डोह बंधाऱ्यात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेला आता पूर्ण एक महिना होऊन गेला, परंतु अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्याविषयी पोलीस ठाण्यात कोणताही पुरावा अथवा तक्रार दाखल न झाल्याने सासवड पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविणे खूप अवघड झाले आहे. याबाबत सासवडचे पोलीस उपनिरीक्षक आणि तपास अधिकारी ए. एस. टापरे यांनी सांगितले, की चांबळी गावचे पोलीस पाटील विश्वनाथ उद्धव शेंडकर यांनी दि. २८ जानेवारी रोजी चांबळी येथील माणिकडोह बंधाऱ्यात एका पुरुष जातीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे सांगितले होते. वय साधारणपणे २५ ते ३० च्या दरम्यान आहे.अंगात काळी जीन्स पॅँट आणि पांढरा बनियन असून, अंगातील पांढरा फुल बाह्याचा शर्ट पाण्यालगत काढून ठेवल्याचे दिसून आले. घटना उघडकीस येण्याच्या सुमारे ६ ते ७ दिवसांपूर्वी ते पाण्यात बुडाले असल्याचा अंदाज असून, अंगावरील कातडी पूर्णपणे निघून सडलेली दिसून आली. त्यानंतर सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरक्रियेसाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला. त्यानंतर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यांना याबाबत खबर देण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत सासवड पोलीस ठाण्यात कोणीही व्यक्ती ओळख पटविण्यासाठी अथवा हरविल्याची तक्रार किंवा इतर कारणास्तव न आल्याने अद्याप ओळख पटविण्यात अडचण येत आहे. (वार्ताहर)
महिनाभर मृतदेह पडूनच
By admin | Published: March 03, 2016 1:37 AM