जयंत धुळप,अलिबाग- जगभर सागरी कासवांची प्रजाती धोक्यात आली असून त्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी, प्रदूषण, मांसासाठी कासवांची हत्या, कासवांच्या अंड्याची चोरी यासारख्या विविध गोष्टींमुळे कासवांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. मात्र आता कासवांचे संरक्षण करूनही नामशेष होऊ पाहात असलेली सागरी कासवांच्या प्रजातींचे संवर्धन करण्याकरिता मोठी जागरूकता कोकण किनारपट्टीत निर्माण झाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वनखात्याने याकरिता कासव संवर्धनविषयक विशेष उपाययोजना केल्या आहेत. गेल्या केवळ दीड महिन्याच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, मारळ आणि हरिहरेश्वर सागर किनारी कासवांच्या अंड्याचे संरक्षण करून त्यातून जन्मलेल्या कासवांच्या ४५० पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले असल्याची माहिती श्रीवर्धन-दिवेआगर सागरी किनाऱ्यावरील कासव संरक्षण प्रकल्पाचे प्रमुख श्रीवर्धनचे वनक्षेत्रपाल नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.सागरी कासव संरक्षण मोहिमेंतर्गत श्रीवर्धन सागरी किनाऱ्यास जोडूनच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले सागर किनारी येथे मंगळवार ४ एप्रिल ते शुक्रवार ७ एप्रिल २०१७ या कालावधीत आंजर्ले ग्रामपंचायत आणि आंजर्ले कासव मित्र मंडळ यांच्या वतीने व रत्नागिरी वनविभाग आणि सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या सहकार्याने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंजर्ले येथे गेली काही वर्षे कासव संवर्धन मोहीम राबविण्यात येत असून येथे कासवाची नवजात पिल्ले समुद्रात जाताना पाहण्याची सुवर्णसंधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी होमस्टेची व्यवस्था असून महोत्सवादरम्यान सकाळी ७ व संध्याकाळी ६ वाजता कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात येणार आहेत. यावेळी कासवांसंबंधित माहिती देण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कासवांबरोबर कोकणातील निसर्गाची ओळख पर्यटकांना व्हावी यासाठी निसर्गभ्रमंती दरम्यान कांदळवनाची तसेच पक्ष्यांची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना देण्यात येणार आहे.आंजर्ले गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावर कासवांची घरटी संरक्षित केलेली आहेत. सागरी कासवे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. किनाऱ्यावरील वाळूत मागच्या पायांनी खड्डा करून त्यात १०० ते १५० अंडी घालतात, खड्डा बुजवून समुद्राकडे परत जातात. ही अंडी नैसर्गिक उष्णतेने उबून ४५ ते ५५ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ४-५ दिवसांनी पिल्ले वाळूतून बाहेर पडून ती आपोआप समुद्राकडे जायला लागतात. अंडी घालून कासवे परत गेल्यावर कधीही आपल्या घरट्याकडे परत येत नाहीत. >महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनसमुद्रात गेलेली पिल्ले मोठी होवून त्याच किनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत येतात. जवळपास एक हजार पिल्लांमधून केवळ एक पिल्लू वाचून मोठे होते. शिवाय समुद्रामार्गे येणारे प्लास्टिक आणि इतर कचरा कासवांना घरटे करण्यास अडथळा निर्माण करतो. अशा कचऱ्यामुळे मादी कासवांना सुरक्षित जागा न मिळाल्याने घरटे न करताच ती परत गेल्याच्या घटनांची नोंद आहे. हे सर्व लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कासवांची घरटी संरक्षित केली असून आंजर्ल्यातील सर्व शाळातील विद्यार्थी एकत्रित येऊन किनारा स्वच्छता मोहीम देखील राबवत असतात. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या आंजर्ले कासव महोत्सवात जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी होवून ग्रामस्थांच्या कासव संवर्धन कार्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आंजर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने तृशांत भाटकर,अभिनय केळसकर, मोहन उपाध्ये यांनी केले आहे.>४० हजार पिल्ले समुद्रात सोडण्यात यशवाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा मागोवा काढून काही लोक त्यांच्या घरट्यांचा शोध घेऊ न अंड्याची चोरी करत. मात्र स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र यांनी केलेल्या जनजागृतीमुळे या प्रकाराला आता आळा बसला आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम १४ वर्षे सातत्याने चालू असून संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील या कामातून एक हजाराहून अधिक घरटी संरक्षित करण्यात येऊ न ४० हजारपेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
दीड महिन्यात ४५० कासवांच्या पिल्लांना जीवदान
By admin | Published: April 04, 2017 3:43 AM