दौंड : कांद्याला शेतकऱ्यांच्या शेतमाला तसेच कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलनाचे मंगळवारी (दि. २०) आंदोलन झाले. या वेळी दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या अंगावर त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी कांदाफेक केल्याने वातावरण गंभीर झाले. दरम्यान, या कांदाफेकीचा उपद्रव निवासी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांनादेखील झाल्याने तहसील कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाचा काही वेळ ताबा घेतला असल्याचे दिसून येत होते. तहसीलदारांच्या टेबलावर कांद्याचा खच साचला होता.तहसील कचेरीच्या बाहेर आंदोलन झाल्यानंतर आंदोलक तहसीलदारांच्या कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेले. या वेळी तहसीलदार उपस्थित नव्हते; मात्र त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे निवेलन स्वीकारण्यासाठी आल्या. या वेळी आंदोलकांनी त्यांच्याभोवती एकच गोंधळ केला. परिणामी, काही आंदोलकांनी त्यांना कांद्याची माळ गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही वेळातच तहसीलदार विवेक साळुंखे आल्यानंतर त्यांच्या दिशेने कांदा भिरकवल्याने त्यांना लागला. एकंदरीतच, गंभीर परिस्थिती पाहता तहसीलदार साळुंखे यांनी आंदोलकांना बाहेर जाण्याचा आग्रह केला; मात्र आंदोलक घोषणांमध्ये दंग झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने या ठिकाणचे वातावरण निवळले. तहसील कचेरीच्या परिसरात आंदोलकांनी कांद्याचा ढिगारा जमा करून आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. या वेळी राज्य शासनाच्या भाजपा आणि मित्रपक्षांच्या शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, इंद्रजित जगदाळे, सोहेल खान, रामदास दिवेकर, माऊली शेळके यांनी शासनाच्या विरोधात संतापाची भावना आपल्या भाषणातून व्यक्त केली. या वेळी योगिनी दिवेकर, बबिता महाले, डॉ. वंदना मोहिते, वैशाली धगाडे, ज्योती झुरुंगे, शीतल भागवत, सीमा पाटोळे, बादशहा शेख, हनुमंत पाचपुते, नानासाहेब फडके, नितीन दोरगे, अजित गायकवाड, ज्ञानेश्वर कापसे, ज्ञानदेव चव्हाण, काशिनाथ जगदाळे, प्रशांत धनवे, राजू कदम, अॅड. युवराजराजे भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. >सोहेल खान यांनी मागितली माफीपुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेल खान जाहीर भाषणात म्हणाले, की कुरकुंभ मोरीच्या प्रश्नावर पत्रकार लिहीत नाहीत. यावर पत्रकारांनी नाराजी व्यक्त करून त्यांचा निषेध केला. मात्र, झाल्यागेल्या प्रकरणाबाबत पत्रकारांची सोहेल खान यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
दौंडला तहसीलदारांना आंदोलकांचा घेराव
By admin | Published: September 21, 2016 1:29 AM