मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या विद्यार्थी वसतिगृहांच्या अचानक तपासणीसाठी भरारी पथके एक महिन्याच्या आत तयार केली जातील, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत सांगितले. या वसतिगृहांचे संनियंत्रण करण्यासाठी समित्या नेमण्यात येतील आणि त्यात विधानसभा व विधान परिषद सदस्यांचा समावेश करण्यात येईल, असे ते म्हणाले.कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील मुलींच्या वसतिगृहात योग्य आहार व सुविधा न पुरविल्याप्रकरणी गृहपालाची बदली करण्यात आली आहे, असे बडोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मात्र, या गृहपालास निलंबित करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच बडोले यांनी निलंबनाची घोषणा केली. राज्यातील अशा वसतिगृहांची अचानक पाहणी करण्याचे काम आपण स्वत: सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना सोईसुविधा पुरविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे बडोले यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ सदस्य पतंगराव कदम यांनी वसतिगृहांच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी या संदर्भात मूळ प्रश्न विचारला होता. (विशेष प्रतिनिधी)श्रेय ‘लोकमत’चे - विखेराज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांची दुरवस्था ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणली, अशी प्रशंसा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ‘लोकमत’ने ते केले नसते, तर अनास्था चव्हाट्यावर आली नसती, असे ते म्हणाले.
वसतिगृहांच्या पाहणीसाठी भरारी पथके नेमणार
By admin | Published: March 15, 2016 1:40 AM