ऑनलाइन लोकमत
दुर्गापूर (चंद्रपूर), दि. 15 - आपल्या आईवडिलांसह लग्नसमारंभात आलेल्या एका आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. कसलाही पुरावा मागे नसतानाही परिश्रमाची शिकस्त करून पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत अनिरुद्ध कृष्णमूर्ती चकिनारपवार (३९) या आरोपीला हुडकून काढले. गुरूवारी रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.चंद्रपूर येथील राधाक्रिष्णा हॉलमध्ये बुधवारी सायंकाळी एक लग्न समारंभ होता. याकरिता ही बालीका आपल्या आईवडीलासह गेली होती. रात्री ९ वाजताच्या दरम्यान आईस्क्रिम खाण्यासाठी ती हॉलबाहेर आली असता अनिरुद्ध चकिनारपवार याने तिला खोटे बोलून आपल्या स्विफ्ट कारमध्ये बसवून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करुन गळ्यातील सोन्याची साखळी काढली व एक तासानंतर रात्री ११.३० वाजता ट्रायस्टार हॉटेल पुढील महामार्गावर बेवारस स्थितीत सोडून पळ काढला. मध्यरात्री ती रस्त्यावर एकटीच रडत असताना बघून लोकांनी तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर तिला पोहचवून दिले.ती बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी रात्रीच दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरुन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी गंभीर दखल घेत दुर्गापूर, रामनगर, बल्लारपूर, मूल पोलिसांची चमू, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शोधमोहिमेवर कामी लावली होती. बालिकेने सांगितलेल्या त्या इसमाच्या व कारच्या वर्णनावरुन एक रेखाचित्रही तयार करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा त्याला सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या त्याच्या घरून अटक केली. सुरूवातील त्याने बरीच उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीमध्ये तो पोलिसांची बरीच दिशाभूल करीत होता. अखेर त्याने गुन्हा कबूल केला. या प्रकरणी त्याच्यावर गुरूवारी भादंविच्या ३६३, ३६६ (अ), ३९४, ३७६ (२) (आय), (जे), सहकलम ५ (एम), ६ (पास्को) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पुन्हा वाढ करून आर्म अॅक्ट ४, २५ या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दुर्गापूर पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास दुर्गापूरचे ठाणेदार आर. के. सिंगनजुडे करीत आहेत.पोलिसांनी जागून काढली रात्रआरोपीे अज्ञात असल्याने आणि प्रकरण फारच गंभीर असल्याने पोलिसांनी संयुक्त पथकांची स्थापना करून शोधमोहीम उघडली. एका पांढऱ्यारंगाच्या कारमधून आपणास नेल्याचे बालिकेने सांगितल्याने आणि कारच्या वर्णनावरून बुधवारच्या रात्री शहरातील आणि मार्गावरील पांढऱ्या रंगाच्या ४५० आय-२० कारची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपासलेल्या फुटेजमध्ये संशयित कार स्विफ्ट असल्याचे लक्षात आल्याने तपास त्या दिशेने वळविण्यात आला. सुमारे २५० स्विफ्ट कारची तपासणी केल्यावर संशयित कार पोलिसांना गवसली. दरम्यान बालिकेच्या सांगण्यावरून पोलिसांनी रेखाचित्र तयार केले होते. ते रात्रीच गॅरेजचालकांना दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेमके यात पोलिसांना यश आले. एका गॅरेजचालकाने रेखाचित्र ओळखले. त्यावरून अधिक माहिती घेतली असता अनिरुद्ध कृष्णमूर्ती चकीनारपवार याच्याकडे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार असल्याचे लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतरअनिरूद्धचा मेडिकलचा व्यवसायआरोपी अनिरूद्ध चकीनारपवार याचे चंद्रपुरातील जनता कॉलेज चौकात भूषण मेडिकल नावाचे दुकान आहे. पोलिसांनी दुकानाची तपासणी केली असता तिथे एक तलावर, सुरा, एअर गन व तीन मोबाईल आढळले. पोलिसांनी ते जप्त करुन शुक्रवारी न्यायालयापुढे सादर केले.