मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार केला. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, मी का भांडतो. गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे नाना पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
यावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले यांनी मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितले.
काहीही असले तरी नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून आता राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. नारायण राणेंनी ट्विट करत नाना पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून पटोले यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. काँग्रेस नेते एवढ्या खालच्या पातळीवर जातील याचे मला कोणतेही आश्चर्य नसल्याचे राणे म्हणाले.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी केली आहे.