पुणे : सनातन संस्थेचा फरार साधक सारंग अकोलकर आणि हिंदू जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या घरी छापे टाकून महत्त्वपूर्ण वस्तू जप्त करण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनानंतर पावणेतीन वर्षांनी उचलण्यात आलेले हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. आता सनातन संस्थेच्या फरार साधकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, सीबीआयने हीच कारवाई तातडीने केली असती, तर कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या टळू शकल्या असत्या. तिन्ही विवेकवादाच्या विचारांना सातत्याने विरोध करणाऱ्या आणि हिंसक कारवायांचे समर्थन करणाऱ्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती यांच्यावर सुरुवातीपासूनच तिन्ही खुनांच्या बाबतीत संशय राहिला आहे. समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला कॉम्रेड पानसरे खून प्रकरणात अटकदेखील झाली आहे. सनातन संस्थेचे वकील संजीव पुनोळकर यांनी सारंग अकोलकर आपल्या संपर्कात असल्याची कबुलीही दिली आहे. तरी या प्रकरणाचा सीबीआय, एसआयटी आणि एनआयए या तिन्ही तपासयंत्रणांनी मुळाशी जाऊन एकत्रित तपास करावा.(प्रतिनिधी)
‘सनातन’च्या फरार साधकांना अटक करा
By admin | Published: June 03, 2016 3:28 AM