विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पुण्याच्या नरेंद्र कुलकर्णी यांचा खून करणाऱ्या पुण्यातीलच सहा जणांना अटक करण्यात खालापूर पोलिसांना यश आले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सोमवारी दिली. २५ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता खालापूर तालुक्यातील वडविहीर गावाच्या हद्दीत चौक ते कर्जत रेल्वेमार्गावर नरेशचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहापासून १५ फूट अंतरावर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खडीवर ठिकठिकाणी रक्ताचे व चिखलाचे डाग असलेली जिन्स पॅन्ट मिळाली होती. पॅन्टच्या खिशात एचडीएफसी बँकेची पुणे येथील हॉटेलची डेबिट कार्डने पेमेंट केलेली चुरगळलेल्या अवस्थेतील एक स्लीप मिळाली. पोलिसांनी हाच तपासाचा पहिला धागा पकडून तपास सुरू केल्यावर, मृतदेह हा नरेंद्र कुलकर्णी याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृत नरेंद्र यांचे आईवडील व मृतदेहावरील रक्ताचे नमुने यांची डीएनए तपासणी करून ओळख पटविण्यात आली.मोहननगर, धनकवाडी, पुणे येथे राहणाऱ्या मुख्य आरोपीने पुणे येथे त्यांच्या साथीदारांसमवेत नरेंद्र कुलकर्णी यांस ठार मारण्याचा कट रचला. २३ डिसेंबर २०१६ रोजी नरेंद्र प्रवीण कुलकर्णी याचा शोध घेऊनही तो भेटू शकला नाही. २४ डिसेंबर २०१६ रोजी नरेंद्रचा पाठलाग करून त्यास त्यांनी पकडले व त्याची स्कुटी नेहमीप्रमाणे पार्क करून नरेंद्रच्याच मोबाइलद्वारे त्याचे वडील व पत्नी यांच्या मोबाइलवर मेसेज पाठविला. त्यानंतर त्यांनी मोबाइल फोन बंद करून त्यास बांधून जुन्या पुणे-मुंबई हायवेने खोपोली परिसरात आणले. खोपोलीतील एका कंपनीच्या पाठीमागील ओसाड मोकळ्या जागेत २४ डिसेंबर २०१६च्या मध्यरात्री तिघा आरोपींनी नरेंद्रच्या चेहऱ्यावर मोठ्या दगडाने व विटेने प्रहार करून त्यास ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह चौक ते कर्जत रेल्वे ट्रॅकवर पोल नं. ८९/२१च्या जवळ फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
नरेंद्र कुलकर्णी खून प्रकरणी सहा आरोपींना अटक
By admin | Published: June 20, 2017 1:34 AM