पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुणे ग्रामीण पोलीस दलातील तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर याला बुधवारी अटक केली. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आंधळकरची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात होती. सीबीआयने यापूर्वीही त्याच्याकडे अनेकदा चौकशी केलेली होती. त्याचा हत्या प्रकरणात थेट सहभाग आहे की त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केल्यामुळे अटक करण्यात आली, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.सतीश शेट्टी हे तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक म्हणून काम करीत होते. तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीमधून प्रभातफेरीसाठी जात असतानाच त्यांच्यावर १३ जानेवारी २०१० रोजी हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास तळेगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (एलसीबी) गेला होता. त्या वेळी आंधळकर एलसीबीचा वरिष्ठ निरीक्षक होता. याप्रकरणी एलसीबीने अटक केलेल्या सहा जणांमध्ये तळेगाव येथील एका वकिलाचाही समावेश होता. दरम्यान, हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. मागील चार वर्षांपासून सीबीआयचे अधिकारी या प्रकणात बारकाईने लक्ष घालून तपास करीत होते. सीबीआयने एलसीबीच्या कार्यालयावर छापे घालून संगणकासह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. सीबीआयने त्यांच्याकडे अनेकदा चौकशी करून त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या होत्या. तपासादरम्यान सीबीआयच्या हाती ठोस पुरावे लागल्यानंतर आंधळकरला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला अटक
By admin | Published: April 07, 2016 3:01 AM