- अझहर शेख
नाशिक : ऋषभदेवनगरीतून जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भिलवाड गावाजवळ असलेल्या ‘मांगीतुंगी’च्या पायथ्याशी जैन धर्माचे पहिले तिर्थंकर भगवान श्री ऋषभदेव यांची १०८ फूटी मूर्ती साकारण्यात आली असून या तीर्थक्षेत्रावर (ऋषभदेवपूरम) साध्वी प.पू. ज्ञानमती माताजी आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाला प्रारंभ झाला आहे. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नुकतेच आगमन झाले आहे. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.
मांगीतुंगी येथे होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने कोविंद हे प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. संपूर्ण विश्वात विशेष महत्त्व प्राप्त असलेल्या या सोहळ्याला जगभरातून भाविक उपस्थित झाले आहेत. ७ लाख ५० हजार चौरस फूट (२५० बाय ३००) इतक्या मोठ्या जागेत भव्य-दिव्य मंडप या सोहळ्यासाठी उभारण्यात आला आहे. या मंडप उभारणीचे काम मागील बारा दिवसांपासून सुरू होते. यासाठी सुमारे शंभराहून अधिक कामगारांनी परिश्रम घेतले. मंडपामधील मुख्य व्यासपीठ १ हजार १४४ चौरस फूटांचे असून त्याची उंची सहा फूट इतकी आहे. भाविकांच्या बैठक व्यवस्थेपासून व्यासपीठाचे अंतर सुमारे ८० फूट आहे. संपूर्ण मंडपाभोवती पत्र्यांचे संरक्षण कुंपण उभारण्यात आले असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस दलासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. दूरवरुन आलेल्या भाविकांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था मांगीतुंगी येथे करण्यात आली आहे.
असे झाले श्री भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्रमी मूर्तीचे निर्माण मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे दुस-या क्रमांकाचे प्राचीन सिध्दक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देतात. मांगीतुंगी पर्वतावर ९९ कोटी मुनींनी तपसाधना करुन मोक्षप्राप्ती केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या पर्वताला जैन धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. पर्वतावर प्राचीन मंदिरे, लेणी, गुहा असून वर्षानुवर्षांपासून येथे जैन समाजबांधवांकडून उपासना केली जाते. जैनधर्माच्या सर्वोच्च गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी १९९६साली चातुर्मासाच्या निमित्ताने मांगीतुंगी येथे आल्या होत्या. त्यावेळी तप, अंतर्ध्यानाने झालेल्या साक्षात्कारानुसार या पवित्र पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ऋषभदेव यांची १०८ फूटी अखंड पाषाणातील मूर्ती निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. माताजी यांनी निश्चित केलेली मुर्तीची जागा पर्वताच्या मध्यावर जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर होती. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तर दूर मात्र पायवाटही अस्तित्वात नव्हती. जगाच्या पाठीवर अखंड पाषाणात १०८ फूटी मूर्ती कोठेही नसल्यामुळे या मूर्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. पर्वताच्या मध्यावर अखंड शिळा शोधून त्यात भगवान ऋषभदेव यांची १०८फूट उंच मुर्ती साकारणे हे एक दिव्यच होते. माताजी यांच्या नेतृत्वाखाली व समितीचे अध्यक्ष कर्मयोगी पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडले. २०१६ साली या विश्वविक्रमी मूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. मूर्तीचा हा पंचकल्याणक महोत्सव सोहळाही विश्वविक्रमी ठरला होता. असा सोहळा दर सहा वर्षांनी मांगीतुंगी या सिध्दक्षेत्रावर साजरा होणार असून यासाठी राज्य शासनाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. समाजाच्या संघटनासाठी मूर्ती निर्माणाचे कार्य महत्त्वाचे ठरले.