नागपूर : गणरायासोबत गुरुवारी सकाळपासून पावसाचे आगमन झाले. विदर्भातील सर्वच जिल्ह्णात परतीचा पाऊस पडला. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशीच आलेल्या पावसाने गणेश भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली असून चंद्रपूर जिल्ह्णातील वीज पडून एक शेतकरी ठार झाला. गडचिरोलीत जिल्हा मुख्यालयापासून १२५ गावांचा संपर्क तुटला, तर गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात विदर्भातील सर्वाधिक पावसाची (१४८.३ मिमी) नोंद करण्यात आली आहे.अमरावती जिल्ह्यात तब्बल ३६ दिवसांच्या प्रदीर्घ दडीनंतर झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना प्रामुख्याने सोयाबीनला दिलासा मिळाला आहे. जमिनीतील आर्द्रतेमुळे रबीची ही आशा वाढली आहे. चंद्रपुरात गोंडपिंपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथे शेतात काम करीत असताना वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.गंगाराम डोंगरे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील टेकळी येथील जिल्हा परिषद शाळेवर बुधवारी सायंकाळी वीज पडली. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)गोंदियात सात तालुक्यांत अतिवृष्टी गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत यावर्षीचा सर्वाधिक पाऊस बरसला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९९.९ मिमी पाऊस झाला असून सात तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पिकांना पावसाची गरज असल्यामुळे अतिवृष्टी होऊनही पिकांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
गणरायासोबत विदर्भात पावसाचेही आगमन
By admin | Published: September 18, 2015 12:36 AM