मुंबई : आर्ट आॅफ लिव्हिंगला या वर्षी ३५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये ११ ते १३ मार्चदरम्यान जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यमुना नदीच्या काठी होणाऱ्या या महोत्सवात १५५ देशांतील ३५ लाख नागरिक उपस्थिती दर्शवणार असल्याचा दावा संस्थेचे विश्वस्त प्रसन्ना प्रभू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे.प्रभू यांनी सांगितले की, ‘तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवस गायन, नृत्य, योगासने अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून, त्यासाठी सुमारे ७ एकर परिसरात भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठा तात्पुरता रंगमंच म्हणून गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद होण्याची शक्यता प्रभू यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी विविध देशांतील आणि विविध धर्माचे संत उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, १२ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर १३ मार्चला महोत्सवाच्या समारोपाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती असेल. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ३५ हजार ९७३ कलाकारांनी नोंदणी केली आहे. या सादरी करणासाठी ६ फूट उंचीपासून ते ५० फूट उंच आणि ७ एकर लांब असा विविध टप्पे असलेला रंगमंच बांधण्यात आला आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रंगमंचाची निर्मिती केली असून, नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लुईस यांनी सर्व महोत्सवातील नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.’
आर्ट आॅफ लिव्हिंगचा ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सव’
By admin | Published: March 04, 2016 3:14 AM