संदीप आडनाईक।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साताऱ्यात मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनामुळे बाधित झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा मृत्यू झाल्याने व्यथित झालेले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी ‘सोन्यासारखी माणसं मरत आहेत, कृपा करा, चित्रीकरणावर बंदी घाला,’ अशी आर्त विनवणी चित्रपट महामंडळाकडे केली आहे.
आशालता यांच्यासोबत ‘माहेरची साडी’ या चित्रपटात काम करणारे ८६ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी चित्रीकरण करणाºया निर्मात्यांवर टीका केली असून, मृत्यूच्या सावटाखाली काम न करण्याची कळकळीची विनवणी कलाकारांना केली आहे. कोणत्याही चित्रीकरणासाठी किमान ७०-८० कलावंत लागतातच. मग शारीरिक अंतर कसे काय राहणार, असा सवाल त्यांनी केला. समूहदृश्य किंवा गाण्याच्या दृश्यात कलावंत एकमेकांजवळ येतोच. त्यामुळे कृपा करा, चित्रीकरण करू नका, असा सल्ला कुलकर्णी यांनी दिला आहे. आपली सोन्यासारखी माणसे अशीच मृत्यूच्या दाढेत देणार काय, असा सवाल करीत चित्रीकरणावर बंदी घाला, अशी मागणी करीत आशालता यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.समाजमाध्यमांमध्ये अनेक प्रश्नज्येष्ठ कलाकारांची काळजी सेटवर घेतली जात नाही; त्यामुळे त्यांनी चित्रीकरणात भाग घेऊ नये. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ कलावंतांना परवानगी देऊच नये; इतकेच नव्हे तर मनोरंजन ही प्राथमिक गोष्ट नसून चित्रीकरणावर बंदी घालावी. आशालता यांचा बळी गेला असून त्यांच्या मृत्यूला निर्माते आणि वाहिनीच जबाबदार असल्याचे अनेक प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केले जात आहेत.