इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:08 PM2024-11-13T16:08:44+5:302024-11-13T16:08:55+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली.
Amit Shah on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्यावरुन वाद सुरू झाला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 परत आणणार असल्याचे सातत्याने सांगत आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड वादावादी झाली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शाह म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत करण्याची भाषा करतात. पण इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही,' अशी स्पष्टोक्ती शाहांनी दिली.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेल
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर होता, मात्र मोदींनी देशाला पाचव्या स्थानावर आणले. 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आघाडीचे लोक (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात. महायुती म्हणजे 'विकास' आणि आघाडी म्हणजे 'विनाश'. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की, उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचे आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.