सुदाम देशमुख
अहमदनगर : धोतर हे एक भारतीय पारंपारिक वस्त्र आहे. धोतर, टोपी, कुर्ता असा मराठी माणसाचा पोशाख आहे. काळानुसार वस्त्र बदलले असले तरी आजही ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक धोतर आणि टोपीच घालतात. भारतीय राजकारणावरही याच पोशाखाचा एकेकाळी प्रभाव होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री, पी. व्ही. नरसिंहराव, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा यांचाही धोतर हाच पोशाख होता. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते महात्मा गांधी हे तर गुडघ्यापर्यंत धोतर नेसायचे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांचा धोतर हाच पोशाख होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आठवताना त्यांचा पेहरावच पहिल्यांदा आठवतो. मराठी चित्रपटात अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू यांच्याही राजकीय भूमिका धोतरावरच गाजल्या. ग्रामीण भागीतल सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंतचे सर्वच राजकारणी एकेकाळी धोतरच नेसायचे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असे धोतर घालणारे नेते होते, मंत्री होते, ज्यांचा राजकारणावर मोठा प्रभाव राहिला. काही नेते धोतराऐवजी पायजमा वापरायचे. अगदी नगर जिल्ह्यातही धोतर नेसणारे अनेक मातब्बर राजकारणी झाले. सहकाराची पायाभरणी करणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात, दादा पाटील राजळे, बापूसाहेब तनपुरे, मारुतीराव घुले, जय टेकावडे, बाबासाहेब ठुबे, बी. जे. खताळ पाटील अशी अनेक नावे सांगता येतील.
शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, दादा पाटील शेळके, रामदास धुमाळ यांची नावे घेतली की धोतर आणि टोपी घातलेल्या नेत्यांची छबी डोळ्यासमोर येते. विधानसभेचे माजी सभापती तथा गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचेही व्यक्तिमत्त्व राजकारणात आदर्श होते. सध्याचे विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांचाही टोपी-धोतर हाच पेहराव आहे. सध्याच्या राजकारणात आता मोदी जॅकेटची चलती आहे. त्याखाली पायजमा किंवा पॅण्ट घातली जाते. धोतर नेसणारे नेते कमी असले तरी त्यांचा राजकारणातील दबदबा आजही कायम आहे. वारकरी संप्रदायात तर धोतर हाच पोशाख असतो. पुरोहित मंडळींनाही धोतर घातल्याशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागातील ज्येष्ठ मंडळींचा पोशाखही धोतरच आहे. सरपंच असो की आमदार हे आपल्या पारंपारिक धोतराच्या पोशाखातच राहायचे. साधी राहणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राहणी साधी असली तरी त्यांचे विचार महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचा लोकांवर प्रभाव पडायचा. मग सभा असो की समारंभ किंवा थेट मंत्रालयात जायचे असले तरी ते याच वेशात जायचे.
राजकारणाची तत्त्वे, निष्ठा सांभाळत राजकारणाला उंचीवर नेणारे, देशाच्या-राज्याच्या प्रगतीत योगदान देणारी ही जुनी मंडळी धोतरामध्येच रहायची. जाडेभरडे, खादीचे धोतर हाच त्यांचा पोशाख होता. पोशाखात बदल झाला तसे धोतर नेसणारेही कमी झाले आहेत. दादा कोंडके यांनीही ‘सासरचे धोतर’ हा चित्रपट काढून चित्रपटसृष्टीतही धोतराचे स्थान अढळ केले.
धोतराची अचानक कशीकाय आठवण झाली, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. अहमदनगर जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्र्यांनी टीका करताता चक्क धोतर फेडण्याचीच भाषा केली. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही चांगलाच रंगात येणार आहे. या प्रचारात टोपी-धोतर घालून प्रचार करणारेही दिसतील, पण पूर्वीच्या धोतर नेसणाऱ्या राजकीय नेत्यांची त्यांना सर येईल का? हाच खरा प्रश्न आहे.