पाली : जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल या वैश्विक समस्यांचा सामना करीत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी गंभीर होत आहे. वन्यजीवांना सुद्धा पाण्याच्या टंचाईचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.यासाठी वन्यजीव हद्द सोडून पाण्यासाठी मनुष्य वस्तीपर्यंत येत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. यासाठी ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग व रायगड उपवनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळणार आहे. या योजनेंतर्गत सुधागड वनक्षेत्रपाल श्रीनिवास रुमडे यांनी वनपाल व वनसंरक्षक यांच्या मदतीने नैसर्गिक स्रोत साफसफाई करून पाण्याचा साठा स्वच्छ केला असून जिथे नैसर्गिक स्रोत नाहीत तिथे कृत्रिम स्रोत निर्माण करून पाणपोई सुरू केल्या आहेत.सुधागड तालुक्यातील १२ हजार ५९५ हेक्टर राखीव वन, ४६ हेक्टर संरक्षित वन आणि ६३९ हेक्टर संपादित वन आहे. या जंगलामध्ये बिबट्या, भेकर, रानडुक्कर, उडती खार, सात ते आठ प्रकारची माकडे, मोर आणि पशू-पक्षी, अनेक वन्यजीव वास्तव्य करीत आहेत. (वार्ताहर)
वन्यजीवांसाठी कृत्रिम तलाव
By admin | Published: May 16, 2016 3:20 AM